नागपूर : बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांच्या पार्श्वभूमीवर ‘प्रतिबंधात्मक आरोग्य’ (प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर) अधिक महत्त्वाचे ठरत असून, ब्लूबेरीसारख्या पोषक फळांचा आहारात समावेश आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो, असा निष्कर्ष नागपुरात आयोजित वैज्ञानिक न्यूट्रिशन परिषदेत मांडण्यात आला.
‘ब्लूबेरीज फॉर बेटर हेल्थ: एव्हिडन्स टू प्रॅक्टिस’ या विषयावर हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे झालेल्या या परिषदेत यू. एस. हायबुश ब्लूबेरी कौन्सिल (यूएसएचबीसी), नेटप्रोफॅन, इंडियन डायटेटिक असोसिएशन आणि आयएपीईएन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील डॉक्टर, न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
परिषदेत तज्ज्ञांनी सांगितले की, आधुनिक जीवनशैलीशी संबंधित आजार- विशेषतः हृदयविकार, मधुमेह आणि स्थूलता यांचे प्रमाण वाढले. यासाठी केवळ उपचारांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक आहे. यासाठी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले ब्लूबेरी हे फळ उपयुक्त ठरू शकते. गटचर्चे दरम्यान वैज्ञानिकांनी यावर भर दिला.
“आहारातील बदल दीर्घकालीन आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
ब्लूबेरी फळामध्ये काय आहे ?
ब्लूबेरीमध्ये अँथोसायनिन्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे हे फळ हृदयाचे आरोग्य सुधारण्यास, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास आणि पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. याशिवाय, मेटाबॉलिक आणि गट हेल्थ सुधारण्यासाठीही ब्लूबेरी उपयुक्त असल्याचे नमूद करण्यात आले.
नाविन्यपूर्ण पदार्थ
कार्यक्रमातील क्युलिनरी सादरीकरणांने विशेष लक्ष वेधले. शेफ आणि फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी ब्लूबेरीपासून तयार केलेले विविध नाविन्यपूर्ण पदार्थ सादर केले. भारतीय तसेच फ्युजन खाद्यसंस्कृतीत ब्लूबेरी सहजपणे समाविष्ट करता येते, हे या सादरीकरणातून अधोरेखित झाले. छोट्या फळामध्ये मोठे आरोग्यदायी फायदे दडलेले असतात, हा संदेश यावेळी देण्यात आला.
यू. एस. हायबुश ब्लूबेरी कौन्सिलचे म्हणने काय?
यू. एस. हायबुश ब्लूबेरी कौन्सिलचे भारतीय प्रतिनिधी राज कपूर म्हणाले, आजच्या काळात आरोग्य ही केवळ उपचारांची बाब राहिलेली नाही, तर ती जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. ब्लूबेरीसारखे फळ आरोग्यदायी आयुष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विज्ञानावर आधारित अशा उपक्रमांमुळे भारतात प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा पाया अधिक मजबूत होऊ शकतो.
