गोंदिया: दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोंडराणी जंगलात एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृत महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याचे व शरीरावर जखमा असल्याचे आढळल्याने तिचा खून करून मृतदेह जंगलात फेकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुनम राकेश तुमाने (वय २८, रा. खैरी, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुनम तुमाने ही महिला २८ जानेवारी रोजी खैरी येथीलच संजय तितमारे याच्यासोबत वाराशिवनी न्यायालयात पेशी असल्याचे सांगून घरून आली होती. यानंतर पुनम व संजय हे दोघेही २८ जानेवारीला तिरोडा तालुक्यातील परसवाडा टी पॉइंटवर आले. तिथून पूनमने आपल्या आईला घरी येणार आहे एवढे सांगून फोन कट केला. मात्र रात्री उशिरापर्यंत पुनम घरी परतली नाही. तिकडे संजयने पुनमच्या घरी जाऊन तुमची मुलगी माझ्यासोबत परत आली नाही, ती घरी आली का? अशी विचारणा पुनमच्या वडिलांना केली. यानंतर ते वाराशिवणी व रामपायलीकडे पूनमचा शोध घेण्यासाठी गेले. पण तिचा शोध न लागल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास बोंडराणी जंगलाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत पळसाच्या झाडाखाली एका तरुणीचा मृतदेह चंद्रकुमार भगत या स्थानिक शेतकऱ्याला दिसून आला. त्यांनी याची माहिती गावकरी व दवनीवाडा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील तपास दवनीवाडा पोलीस करीत आहेत.
मृत महिलेची ओळख…
खैरी येथील रहिवासी पुनम तुमाने ही २८ जानेवारीपासून बेपत्ता असल्याची तक्रार खैरलांजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होती. त्यानंतर मंगळवारी दुपारी बोंडराणी परिसरात मृतदेह आढळल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर दवनीवाडा पोलिसांनी खैरलांजी व मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पुनमचे कुटुंबीय मृतदेह पाहण्यासाठी बोंडराणी येथे पोहोचले. त्यांनी तो मृतदेह पुनमचाच असल्याचे पोलिसांना सांगितले.
फॉरेन्सिक पथकाला केले घटनास्थळी पाचारण
बोंडराणी जंगल परिसरात आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकल्याचे व पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. तसेच मृतदेहाच्या ठिकाणी एक लोखंडी बत्ता आणि चाकू आढळला. दरम्यान दवनीवाडा पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक चमूला पाचारण केले होते.

