यवतमाळ : बसस्थानक परिसरात सकाळच्या वेळी सर्वत्र प्रवाशांची गर्दी असताना अचानक पोलिसांची वाहने सायरन वाजवत बसस्थानकात शिरले. पोलिसांचा ताफा, शस्त्रधारी पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. बसस्थानकात बॉम्ब असल्याचे सांगताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली.

बॉम्ब असल्याचा निनावी फोन

सकाळी ९:२५ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, बसस्थानकाच्या वाहन पार्किंग परिसरात एका अज्ञात व्यक्तीने घातपाताच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे. ही माहिती मिळताच संपूर्ण यंत्रणा हाय-अलर्टवर आली. अवघ्या काही मिनिटांत बॉम्ब शोधक-नाशक पथक, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम, क्यूआरटी आणि आरसीपी पथकासह रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वाहतूक पोलिसांनी तत्काळ परिसरातील रस्ते बंद करून गर्दीवर नियंत्रण मिळवले.

संशयास्पद बॅग आढळली आणि…

श्वान पथकाच्या मदतीने परिसराची कसून तपासणी करण्यात आली असता संशयास्पद बॅग मिळून आली. तपासणीदरम्यान सदर बॉम्ब जागीच निकामी करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे लक्षात येताच, बॉम्ब शोधक पथकाने रिमोट तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत सावधगिरीने ती बॅग सुरक्षितरित्या ‘बॉम्ब बास्केट’मध्ये हलवली. त्यानंतर ती बॅग शहराबाहेरील एका निर्मनुष्य ठिकाणी नेऊन तिथे बॉम्ब यशस्वीरित्या निकामी करण्यात आला. यानंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे भौतिक पुरावे गोळा करण्याचे कौशल्य दाखवले.

yavatmal bomb squad (फोटो- लोकसत्ता)
संशयास्पद बॅग आढळली आणि…

आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल सज्ज

देशातील सद्यस्थिती आणि घातपाताच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस दल किती सज्ज आहे, याचे हे जिवंत प्रात्यक्षिक होते. निमित्त होते, जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मॉकड्रिल’चे. सुमारे पाऊण तास चाललेल्या या थरारानंतर, ही केवळ एक रंगीत तालीम (मॉकड्रिल) असल्याची अधिकृत घोषणा मेगा फोनद्वारे करण्यात आली, तेव्हा कुठे प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. यात पोलीस उपअधीक्षक सुनील हुड, दिनेश बेसाने यांच्यासह सतीश चवरे, आनंद वागतकर, रामकृष्ण जाधव, नंदकिशोर काळे, ज्ञानोबा देवकते या पोलीस निरीक्षकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दहशतवाद विरोधी शाखेचे प्रमुख देविदास पाटील, बॉम्ब शोधक पथकाचे रूपेश तिजारे, फॉरेन्सिक विभागाचे ज्ञानेश्वर मुंडाले आणि क्यूआरटी पथकाचे आकाश काळे यांनी चोख कामगिरी बजावून पोलीस दलाची कार्यक्षमता सिद्ध केली.

yavatmal bus stand news (फोटो- लोकसत्ता)
आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दल सज्ज

नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बेवारस वस्तू, खेळणी किंवा संशयास्पद बॅग आढळल्यास तिला हात न लावता तात्काळ डायल ११२ किंवा पोलीस नियंत्रण कक्षास संपर्क साधावा, असे आवाहन यवतमाळ पोलीस दलाने यानिमित्ताने केले आहे. ‘सजग नागरिकच शहराच्या सुरक्षेत मोलाची भर टाकू शकतात,’ असा मोलाचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.