नागपूर : पती-पत्नीमध्ये वैवाहिक वाद ही फार मोठी समस्या झाली आहे. वैवाहिक वादांमुळे घटस्फोटांची प्रकरणेही वाढलेली आहे. काही ठिकाणी पतीद्वारा पत्नीचा छळ होतो तर काही ठिकाणी पत्नीद्वारा पतीचा छळ होत असल्याच्या तक्रारी येतात. अलिकडेच वैवाहिक वादाचे एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सुनावणीसाठी आले होते. पत्नी छळ करत असल्याचा आरोप करत पतीने घटस्फोटाची मागणी केली होती. पत्नीची वागणूक इतर ठिकाणी सामान्य असली तरी ती छळ करत नाही असा अर्थ होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पत्नीवर आरोप काय?

पती आणि पत्नी दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक असून त्यांचा विवाह ९ मार्च २०१९ रोजी पारंपरिक पद्धतीने अकोल्यात झाला. विवाहानंतर काही दिवसांतच पतीने पत्नीच्या वर्तनाबाबत असामान्य अनुभव मांडले, ती सहसा अबोल राहणे, सहकाऱ्यांशी संवाद टाळणे, तसेच हनिमूनदरम्यानही सामान्य दांपत्यासारखे वागण्यात अनास्था दाखवणे असे आरोप करण्यात आले. पुढे, मुंबईत राहात असताना पत्नीने सार्वजनिक ठिकाणी पतीशी वाद घालणे, मोटारसायकलवरून अचानक उडी मारणे, थप्पड मारणे आणि आत्महत्येच्या धमक्या देणे अशा घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. या वर्तनामुळे चिंताग्रस्त झालेल्या पतीने पत्नीच्या पालकांशी संपर्क साधला, त्यानंतर पत्नीला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले. काही डॉक्टरांनी तिच्यात ‘पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ असल्याचे निदान केल्याचा दावा पतीने केला, मात्र पत्नीने हे सर्व आरोप फेटाळले. दोघांनी विवाह समुपदेशनाचाही प्रयत्न केला, परंतु त्यातून कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही.

न्यायालय काय म्हणाले?

न्यायालयाने निर्णयात नमूद केले की, विवाहापूर्वी किंवा कार्यस्थळी कोणतेही असामान्य वर्तन दिसून आले नाही, यावरून वैवाहिक आयुष्यात क्रौर्य झाले नाही असे म्हणता येत नाही. एखादी व्यक्ती इतर ठिकाणी सामान्यपणे वागत असली तरी जोडीदाराबाबत मात्र ती क्रूर वर्तन करू शकते. न्यायालयाने पुढे नमूद केले की, वैवाहिक आयुष्यातील क्रौर्याच्या घटना बहुतेक वेळा घराच्या चार भिंतींत घडतात. त्यामुळे स्वतंत्र साक्षीदार सहसा उपलब्ध नसतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच पुराव्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. पत्नीच्या अस्थिर वर्तनामुळे आणि दीर्घकाळ चाललेल्या वादांमुळे पतीला त्रास सहन करावा लागल्याचे निष्पन्न होत असल्याचे निरीक्षण नोंदवत, कुटुंब न्यायालयाचा निर्णय टिकू शकत नाही, असे सांगून उच्च न्यायालयाने अपील मंजूर करत घटस्फोटाचा आदेश दिला.

मानसिक आजार आवश्यक नाही  

‘मानसिक अस्वस्थता’ हा मुद्दा मागे घेतला तरी क्रौर्याच्या आरोपांवर त्याचा परिणाम होत नाही. या प्रकरणात स्वतंत्रपणे घडलेल्या अनेक घटना नोंदवण्यात आल्या होत्या, जसे की चालू मोटारसायकलवरून उडी मारणे, सार्वजनिक ठिकाणी मारहाण, फोनवरून शिवीगाळ, भावनिक ब्लॅकमेल आणि स्वतःच्या अविवेकी वर्तनाची कबुली. या सर्व घटनांवरून क्रौर्य सिद्ध होते आणि त्यासाठी कोणत्याही वैद्यकीय निदानाची आवश्यकता नसते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.