नागपूर : सरकारी कर्मचाऱ्याला वेतननिश्चितीतील चुकीमुळे अतिरिक्त रक्कम मिळाली असेल आणि ती परत करण्याचे हमीपत्र त्याने दिले असेल, तर केवळ आपण कोणतीही फसवणूक किंवा चुकीचे प्रतिपादन केले नाही, या कारणावरून वसुली टाळता येणार नाही. चुकीने दिलेली रक्कम ही सार्वजनिक निधीतील असून, त्यावर कर्मचाऱ्याचा हक्क निर्माण होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, वसुलीमुळे असाधारण आर्थिक हालअपेष्टा होणार असल्याचे सिद्ध करणेही आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अतिरिक्त रकमेच्या वसुलीबाबत महत्त्वाचे कायदेशीर स्पष्टीकरण मिळाले आहे.न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्या. निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
नेमके प्रकरण काय?
गडचिरोली जिल्हा परिषदेतील निवृत्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजय सोनाजी सुरडकर यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरडकर यांना २००४ मध्ये शासन निर्णयानुसार एकस्तर पदोन्नतीच्या स्वरूपात ६,५००-२००-१०,५०० ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली होती. मात्र, ही वेतनश्रेणी देताना नियमांचे पालन झाले नसल्याचे निवृत्तीच्या वेळी वेतन पडताळणीत आढळले. त्यामुळे १ जुलै २००२ ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत अधिक वेतन दिल्याचे निश्चित करून प्रशासनाने ८ जुलै २०२५ रोजी वसुलीचा आदेश काढला. त्यानुसार ११ लाख १३ हजार ७५० रुपये देय असलेल्या ग्रॅच्युइटीतून ३ लाख ७० हजार ४८ रुपये वजा करून उर्वरित ७ लाख ४३ हजार ७०२ रुपये देण्यात आले. याचिकाकर्त्याने या कारवाईला आव्हान दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे मत काय?
याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध रफिक मसीह (२०१५) या निकालाचा आधार घेतला. या निकालानुसार वर्ग तीन आणि चार कर्मचाऱ्यांकडून, निवृत्त कर्मचाऱ्यांकडून किंवा निवृत्तीच्या एक वर्षाच्या आत असलेल्या कर्मचाऱ्यांकडून तसेच पाच वर्षांपेक्षा जुन्या अतिरिक्त वेतनाची वसुली करणे सामान्यतः अनुचित ठरू शकते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्ट ऑफ पंजाब अँड हरियाणा विरुद्ध जगदेव सिंह (२०१६) या प्रकरणात कर्मचाऱ्याने अतिरिक्त रक्कम परत करण्याचे हमीपत्र दिले असल्यास त्याला त्या हमीपत्राची बांधिलकी पाळावी लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे हमीपत्राच्या अस्तित्वाला या प्रकरणात महत्त्व प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. एम. के. रवी वर्मा विरुद्ध नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या प्रकरणातही हमीपत्राच्या आधारे अतिरिक्त वेतनाची वसुली योग्य ठरविली. मात्र, वसुलीमुळे होणारी असाधारण आर्थिक हानी कर्मचाऱ्याने ठोस पुराव्यांसह मांडल्यास न्यायालय हस्तक्षेप करू शकते, असेही स्पष्ट केले. केवळ आर्थिक अडचण होईल, एवढे सांगणे पुरेसे नाही.
औरंगाबाद खंडपीठाचा वेगळा निकाल
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुधाकर सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणात वेगळा निकाल दिला होता. संबंधित कर्मचारी वर्ग तीनमधील असून, सुमारे २५ वर्षांनंतर ४ लाख १५ हजार ६३२ रुपयांची वसुली करण्यात आली होती. तसेच, हमीपत्र कोणत्या वैधानिक तरतुदीनुसार घेतले, हे सरकारला दाखवता आले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने वसुली रद्द करून सहा टक्के व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश दिले.
या दोन्ही प्रकरणांतील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे नागपूर खंडपीठाच्या निकालातून स्पष्ट होते. सुरडकर यांनी निवृत्तीच्या काही महिन्यांपूर्वीच १ जानेवारी २०२५ रोजी हमीपत्र दिले होते. शिवाय, वसुलीमुळे असाधारण हालअपेष्टा होणार असल्याचे त्यांनी याचिकेत सिद्ध केले नव्हते. त्यामुळे रफिक मसीह निकालातील संरक्षणाचा लाभ त्यांना देता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सार्वजनिक निधीतून कायदेशीर अधिकाराविना दिलेली रक्कम परत करणे ही प्राप्तकर्त्याची जबाबदारी असल्याचे नमूद करत खंडपीठाने याचिका फेटाळली.
