वर्धा : बोर व्याघ्र प्रकल्प हा जैव विविधतेने नटलेला सर्वात मौलिक खजिना म्हणून ओळखल्या जातो. वाघ, बिबट हे मुख्य कारभारी असलेल्या या बोर अरण्यात विविध पक्षी, चतुष्पाद प्राणी, कृमी, कीटक, अळ्या या जीवांसोबतच विपुल वन संपदा आहे. औषधी वनस्पतीची तर भरमार. मौल्यवान साग तर रांगेत गर्दी करून उभे. म्हणून वन्य प्रेमी व अभ्यासक वाघच नव्हे तर या अन्य बाबी तपासण्यास बोर येथे भ्रमंती करीत असल्याचे वन अधिकारी सांगतात.
नुकताच जागतिक पाणथळ दिवस साजरा झाला. त्या निमित्याने बोर व्याघ्र प्रकल्प व बहार नेचर फॉउंडेशन या पक्षीप्रेमी संस्थेने पक्षीनिरीक्षण केले. तसेच स्वच्छता अभियान पण राबविले. बोर बफर क्षेत्रातील रिधोरा धरणाच्या जलाशयावर विविध प्रकारच्या पाणपक्ष्यांची नोंद करण्यात आली. राजहंस या स्थानिक स्थलांतरित पक्ष्याचा ७०च्या संख्येतील थवा पाणथळ परिसरात दिसला. सोबतच चक्रवाक, नदी सुरय, कवड्या खंड्या, पाण कावळा, काळा शराटी, गाय बगळा, ढोकरी, शेकाट्या, चिखल्या, टिटवी आदी पक्षी या दलदल असलेल्या भागात विहंग करीत होते.
कवड्या खंड्या हा पक्षी पाणथळ प्रदेशाचा राजा म्हटल्या जातो. भारतीय उपखंडात त्याच्या ९ प्रजाती आढळून येतात. त्यापैकी चार प्रामुख्याने विदर्भात दिसतात. किडे, लहान मासे, बेडूक हे त्याचे खाद्य. पाण्यावर शिकारीसाठी एकाग्रतेने फडफड करीत अत्यंत वेगाने पाण्यात सूर मारत शिकार करणे हे त्याचे वैशिष्टय. पांढऱ्या छातीच्या खंड्यास फक्त खंड्या नावाने ओळखल्या जाते.
तर काळा शराटी हा रंग दाखविणारा म्हणून ओळखल्या जातो. याची चोच, डोके व मान तसेच पाय काळ्या रंगाचे असून उर्वरित शरीर पांढऱ्या रंगाचे असते. चोच बाकदार. वीण काळात नराच्या पाठीकडील भाग आणि पंख काळपट करड्या रंगाचे होतात. अन्यथा नर व मादी दिसायला सारखेच असतात. पाणथळ परिसरात ते थव्याने राहतात. बोर प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांनी बोरमध्ये निवास असणाऱ्या विविध पक्ष्यांची माहिती दिली.
मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी पक्ष्यांची माहिती दिली. यंत्र तंत्र युगात आता पक्षी जपणे आवश्यक ठरले असल्याचे ते सांगतात. या परिसरात मासेमारी होते. कंत्राट आटोपले तरी जाळे पाण्यात व बाहेर तसेच पडून असतात. त्या जाळ्यात अडकून अनेक पक्षी मृत पावतात. म्हणून हे जाळे काढून टाकण्याची सूचना इंगळे यांनी केली. निसर्गप्रेमी संस्थांना सोबत घेत जलाशय परिसरात कचरा निर्मूलन अभियान राबविता येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली. वन परीक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर, सहाय्यक वसंत खेलकर, पद्माकर ठवरी तसेच राजू ढोबळे, तुमडम,व अन्य कर्मचारी आणि बहारचे दीपक गुढेकर, राजदीप राठोर, राहूल तेलरांधे, सुरज बोदीले, सुर्वी, सुवीर बोदीले यांचा निरीक्षण चमूत सहभाग राहला.

