वर्धा : देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या बोर प्रकल्पत बोरची राणी व तिचे दोन व बछडे यांचा उधम चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे या परिवाराचा कधीच मनुष्य – प्राणी संघर्ष झालेला नाही. सुपर्रमॉम, टुरिस्ट फ्रेंडली, महाराणी अशी ख्याती झालेल्या कॅटरीना वाघीनीचा रोज नवनवा अंदाज बघायला मिळत आहे. आता ताजा कॅमेराकैद व्हिडीओ तर थक्क करून जातो. बोर प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपलब्ध करून दिलेला हा व्हिडिओ वाघीनीच्या नजाकतभरा अंदाज की काय, दाखवून देतो.

ही नक्की कॅटरीनाच असे विचारल्यास अधिकारी म्हणतात आम्ही वाघ परिवाराच्या सावलीतच वावरतो. म्हणून ओळख पक्की. तर कॅटरीनाने पर्यटकांना या पूर्वी दिलेले दर्शन व हे झाडावरील कॅटवॉकचे दर्शन यात फार फरक आहे. यात कॅटरीना जणू बोर साम्राज्याची  टेहळनीच करीत असल्याचे जाणवते. निष्पर्ण झाडावर चढून ती मागोवा घेत आहे.

चौफेर नजर, सावध चाल, मानेस किंचित मुरड अश्या रुबाबदार स्थितीत तिचे हे दर्शन घडले आहे. आता पर्यटक की भक्ष्य, तिची नजरफेर कशासाठी, हे पाहणाऱ्यानेच सांगावं, अशी प्रतिक्रिया येते.सध्या तिचे दोन बछडे आता मोठे होवू लागले आहे. १८ महिन्याच्या या दोन बछड्याचे  अद्याप नामकरण झालेले नाही. पण ते आता स्वतंत्र अधिवास शोधण्याच्या तयारीत असल्याचे वन अधिकारी सांगतात.

परिणामी माता कॅटरीना सोबत ते दोन्ही आता अभावानेच दिसत असतात. कॅटरिनाचे अधिवास क्षेत्र पण आता आक्रसत चालले असल्याचे सांगितल्या जात आहे. तसे या बोर जंगलात तिचे अधिवास क्षेत्र सर्वात मोठे राहले. पण वाढत्या वयानुसार ते कमी कमी होत आहे. पण तिचे दोन युवराज बोर साम्राज्यचा ताबा घेण्यास सज्ज असल्याचे गंमतीत म्हटल्या जाते. आता तर ती तिच्या या दोन युवराजचा तर शोध घेत नाही ना, अशी टिपणी होते. कारण कॅटरीनाचा वावर जंगल जंगल पता देणारा असतो.