नागपूर : तहान लागली आणि अंगाची लाहीलाही झाली म्हणून वाघ पाणवठ्याकडे निघाला, पण बघतात तर काय..? त्याला पाणवठ्यात प्लॅस्टिकची बादली दिसली आणि तो चक्क पाण्याची बादली घेऊन पाणवठ्याबाहेर पडला.
बोर व्याघ्रप्रकल्प ताडोबाच्या वाटेवर
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात ‘नयनतारा’ ही वाघीण पाणवठ्यातून पाण्याची प्लॅस्टिकची बाटली बाहेर काढतानाचा वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांचा व्हिडिओ जगभरात गाजला. त्यानंतरही या व्याघ्रप्रकल्पात सातत्याने वाघ कधी मजुराचे जोडे घेऊन, तर कधी मजुरांचे डबे घेऊन, तर कधी प्लास्टिकचे डबे घेऊन जातानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. आता बोर व्याघ्रप्रकल्प देखील त्याच वाटेवर चालल्याचे दिसून येत आहे. या व्याघ्रप्रकल्पात पाणवठ्यातून प्लॅस्टिकची बादली घेऊन बाहेर येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाणवठे वन्यजीवांसाठी जीवदान
रणरणत्या उन्हात जंगलातील पाणवठे म्हणजे वन्यजीवांसाठी जीवदान. बोर व्याघ्रप्रकल्पातीळ अंभोरा पाणवठ्यावर असेच एक दृश्य बघायला मिळाले. या पाणवठ्यात काही वाघ निवांतपणे विसावले होते. उन्हाच्या तडाख्यात अंगाची होणारी लाहीलाही कमी करण्यासाठी ते पाण्यात पहुडलेले. सभोवताल शांत जंगल, अगदी झाडांच्या पानांचाही आवाज नव्हता. आणि त्याचवेळी त्या शांततेला छेद देणारे एक दृश्य समोर आले. पाण्यात एक प्लॅस्टिकची तरंगत होती. पाण्यात डुंबणाऱ्या वाघाला ती दिसताच त्याने ती बादली तोंडात पकडली. आणि तो जंगलाच्या दिशेने चालू लागला.
मानवी निष्काळजीपणाचे चित्र
वाघ म्हणजे जंगलाचा राजा..हाच जंगलाचा राजा जेव्हा मानवी कचरा तोंडात घेऊन फिरताना दिसला आणि त्या एका क्षणाने अनेक अस्वस्थ प्रश्न उभे केले. हे दृश्य मानवी निष्काळजीपणाचे भयावह वास्तव अधोरेखित करणारे आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्रप्रकल्पात कधीकाळी फार वाघ दिसत नव्हते, पण आता तिथे वाघांची संख्या वाढली. त्याचबरोबर या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसह मानवी हालचाली देखील वाढल्या आणि त्याच मानवी निष्काळजीपणाचे चित्र दिसून आले. प्लॅस्टिकची बादली थेट वाघांच्या पाणवठ्यापर्यंत पोहचतेच कशी, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
संवर्धनाची प्राथमिकता विसरले
उन्हाळ्यातील पाणवठे हे वन्यप्राण्यांसाठी जीवनवाहिनी मानले जातात. अशा ठिकाणी प्लास्टिकसारखा कचरा आढळल्यास प्राण्यांना दुखापत होणे, प्लास्टिक गिळले जाणे, पाण्याचे प्रदूषण किंवा त्यांच्या नैसर्गिक वर्तनात बदल होण्याचा धोका वाढतो. संवर्धन म्हणजे फक्त वाघांची संख्या वाढवणे नव्हे. त्यांच्या अधिवासाची स्वच्छता, सुरक्षितता आणि नैसर्गिकता जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, ही प्राथमिकता आता सारेच विसरत चालले आहेत.
