वर्धा : व्याघ्र प्रकल्पचा राजा वाघ आणि पक्ष्यांचा राजा मोर यांचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या बोर प्रकल्पात पहाटेपासून प्राण्यांची जगरहाटी सूरू होते. म्हणूनच हमखास वाघ बघायचा असेल तर सकाळीच सफारी गाड्या पकडण्याची पर्यटकांची धावपळ सूरू होते. आता तर पाण्याच्या शोधात प्राणी सैरभैर फिरत असण्याचे दिवस आहेत. त्यात एका क्षणाचा टिपलेला हा vidio जंगल जीवन बोलके करतो. प्राणी त्यांच्या शत्रूपासून कसे एकमेकांना सावध करतात, ते बघायला मिळते.

चितळ आणि वैविध्य

या अभयारण्यात प्राण्यांची विपुलता आहे. त्यात काही तर मोठाल्या कळपात दिसून येतात. चितळ, कळविट व हरीण हे सहोदर ईथे सुखनैव नांदतात. चितळ हा असाच मोहक व शांत स्वभावाचा प्राणी. त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र ठिपके असतात. म्हणून त्यास चितळ संबोधतात. फक्त नर चितळास शिंगे असतात. ही शिंगे फ़ांद्यासारखी असून दरवर्षी गळतात व पुन्हा नव्याने येतात. बोर वनात १० ते ५० च्या संख्येत चितळ आढळून येतात. हे अत्यंत चपळ व सदा सतर्क असतात. ईथे वाघ व बिबट हे पण लक्षणीय संख्येत म्हणून त्यांच्यापासून सावध राहण्यात कसोटी.

असे होतात सावध.

चितळ हे अन्नसाखळीत महत्वाचे. कारण ते वाघ, बिबट व रानकुत्र्यांचे मुख्य खाद्य म्हटल्या जातात. इथला वाघ अन्यत्र भटकत नाही, त्यामागे चितळ मोठ्या प्रमाणात असणे हेच कारण दिल्या जाते. तर असे चौफेर शत्रू टपून बसले असतांना सावध राहणे आवश्यक. वाघ किंवा बिबट अशा शिकारी प्राण्यांची चाहूल लागताच ते विशिष्ट आवाजात ओरडून ( Alarm Call ) अन्य प्राण्यांना सावध करतात. तोच अनुभव या व्हिडिओतील चितळास आला असण्याची शक्यता. सकाळच्या वेळेत पक्ष्यांचा कलरव, प्राण्यांचा आर्त स्वर व पानांची सळसळ असे हे बोरमधील रम्य दृष्य.

माकड व चितळ मैत्री.

या जंगलात अनेकदा चितळ व माकडं एकत्र दिसतात. माकडे झाडावरून फळं व पाला खाली टाकतात. तेच चितळ आवडीने खातात. उंचावर असलेली माकडं शत्रूची चाहूल लागताच चितळाना सावध करतात, असे निरीक्षण वन अधिकारी नोंदवितात. माकडं चितळास तर चितळ इतर प्राण्यास सावध करण्याची बाब वन्य जीवनातील अनोखी मैत्री समजल्या जाते. या व्हिडीओत असाच शत्रूपासून दक्ष झालेला चितळ नर दिसत आहे. नव्याने सूरू झालेल्या या प्रकल्पातील राहाटी गेटवरील ही हालचाल आहे. सर्वात सुंदर व मोहक चितळ प्राण्याचे ईथे सहज दर्शन घडते.