आजपासून दोन्ही लसमात्रा अनिवार्य

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश काढले.

धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांसाठी आदेश

नागपूर : करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे आदेश काढले. यानुसार, विविध आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना व तिथे येणाऱ्या सर्व नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणे बंधनकारक असेल. तर काही ठिकाणी किमान एक लसमात्रा आवश्यक आहे. हा आदेश ९ नोव्हेंबरपासून लागू होईल.

आयुक्तांच्या आदेशानुसार धार्मिक स्थळी काम करणारे संपूर्ण व्यवस्थापन, कर्मचारी तसेच प्रवेश करणाऱ्या नागरिकांनाही करोनाच्या दोन लसमात्रा पूर्ण होणे आवश्यक असेल. लसीकरण प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील. सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने, धार्मिक यात्रा, उत्सवात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्याही दोन लसमात्रांचे बंधन असेल. सरकारी, निमसरकारी व खाजगी कार्यालये, तत्सम संस्थांमध्ये कार्यरत कर्मचारी, अधिकारी, कामानिमित्त येणारे १८ वर्षांवरील सर्व अभ्यागतांना दोन मात्रा किंवा किमान पहिली लस मात्रा घेतलेली असणे आवश्यक असेल.

शहरातील सर्व उद्याने, वाचानालये, अभ्यासिका, मंगल कार्यालय, लॉन, सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या सर्व १८ वर्षांवरील नागरिकांनी   किमान एक लसमात्रा घेतली असणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था आदीमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दोन लसमात्रा पूर्ण होणे आवश्यक राहील.

सार्वजनिक परिवहन व्यवस्थेअंतर्गत येणाऱ्या महामंडळ, शहर बस वाहतूक, ऑटो-रिक्षा याद्वारे प्रवास करणाऱ्या १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. बाजार व दुकानांचे मालक व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याही लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या असणे आवश्यक आहे.

शहरातील पदपथावर हातगाडय़ावर साहित्य विक णारे व तत्सम प्रकारच्या सर्व विक्रेत्यांनी किमान एक लस घेतली असणे आवश्यक आहे. सरकारी, निमसरकारी व खाजगी आरोग्य संस्थांत कार्यरत सर्वाच्या लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या असणे आवश्यक राहील. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या किमान एक मात्रा घेतली असणे आवश्यक आहे.

लसीकरणाचे प्रमाणपत्र ओळखपत्रासोबत दाखविणे आवश्यक  या सर्व ठिकाणी संबंधितांना लसीकरणाचे प्रमाणपत्र फोटो ओळखपत्रासोबत दाखविणे आवश्यक राहील. १८ वर्षांखालील मुला-मुलींना वयाचा योग्य पुरावा दाखवावा लागेल. विशेष म्हणजे नागपूर महानगरपालिकेतर्फे आकस्मिक तपासणी करण्यात येईल. अनियमितता आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Both vaccines mandatory today ysh

Next Story
साठवणुकीच्या अयोग्य पद्धतीमुळे राज्यात धान्याची नासाडी सुरूच
ताज्या बातम्या