लोकसत्ता टीम
नागपूर : गणेशोत्सवानिमित्त नातेवाईकांच्या गावी गेलेल्या १२ वर्षीय मुलीने मावशीच्या मोबाईलवरून प्रियकराला मॅसेज केला. प्रियकराचा तासाभराने ‘आय लव यू’ असा रिप्लाय आला. त्यामुळे मावशीला धक्का बसला. त्यामुळे मावशीने मुलीची आस्थेने चौकशी केल्यानंतर प्रियकराने केलेले धक्कादायक कृत्य उघडकीस आले. प्रियकराने चक्क ६ महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याची माहिती समोर येताच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक तरारे (३०) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी पीडित मुलगी स्विटी (बदललेले नाव) ही सातवीत शिकते. आई-वडिल शेतमजूर असून तिला लहान भाऊ आहे. गेल्या १ एप्रिलला तिच्या वडिलाला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पती-पत्नी उपचारासाठी शहरात मुक्कामी होते. यादरम्यान, स्विटी शेजारी राहणारा आरोपी अशोक तरारे याच्या घरी राहत होती. एका खासगी कंपनीत मजूर असलेल्या अशोकची वाईट नजर स्विटीवर पडली. स्विटी आंघोळीला गेल्यानंतर तो बाथरुमध्ये घुसला. अचानक अशोक आल्याने ती घाबरली. त्याने तिचे तोंड दाबून अश्लील चाळे केले. त्यानंतर रात्री झोपेत असलेल्या स्विटीला उचलून गायीच्या गोठ्यात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. आई-वडिल घरी नसल्यामुळे ती कुणालीही सांगू शकली नव्हती. तेव्हापासून अशोक हा मनात येईल त्यावेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.
आणखी वाचा-छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार
गेल्या सहा महिन्यांपासून स्विटी त्याचा लैंगिक अत्याचार सहन करीत होती. कुणालाही सांगितल्यास गावात बदनामी करून आईवडिलांनाही सांगण्याची धमकी दिली. तसेच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. होणारी पत्नी असल्याची भावना असल्याने ती अशोकची शारीरिक संबंधाची मागणी वारंवार पूर्ण करीत होती. गणेशोत्सवासाठी ती मावशीच्या गावी गेली होती. तिने मावशीच्या मोबाईलवरून अशोकला मॅसेज पाठवला. मात्र, अशोकने तासाभराने रिप्लाय करीत “आय लव यू’ असा मॅसेज केला. विवाहित असलेली मावशी गोंधळली आणि तिने स्विटीला विश्वासात घेतले. तिने अशोकचे नाव सांगून त्याने लग्नाचे आमिष दाखविल्याचे कबूल केले. मावशीने तिच्या आईवडिलांना कल्पना दिली आणि उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी अशोकला अटक केली.