देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : नेहमी एका विशिष्ट विचारधारेला प्राधान्य देत असल्याचा ठपका झेलणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आता मानसशास्त्रीय अभ्यासक्रमाच्या कक्षेत मोडणाऱ्या ‘मन व्यवस्थापन’ विषयाचे धडे देण्यासाठी ईश्वरीय शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाची निवड केली आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची निवड झाल्यापासून येथे सुरू होणारे नवीन अभ्यासक्रम वादाचा विषय ठरले आहेत.  आता विद्यापीठाच्या इतिहास विभागाने ‘मन व्यवस्थापन’ विषयावर एक दहादिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासाठी ५० रुपये भरून विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. ‘मन व्यवस्थान’ हा अभ्यासक्रम मानसशास्त्राच्या कक्षेत मोडणारा आहे. त्यामुळे अशा विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी एखाद्या मानसशास्त्रामधील तज्ज्ञाला बोलावणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता प्रशासनाने ईश्वरीय शक्तीवर विश्वास ठेवणाऱ्या ब्रह्माकुमारी संस्थेच्या नागपूर केंद्राची मदत घेतली आहे. त्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना ‘मन व्यवस्थापना’चे धडे दिले जाणार आहेत. नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे गणेश अथर्वशीर्षांचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता. या अभ्यासक्रमावरही टीका झाली होती.

ब्रह्माकुमारी संस्थेचे काम वरपांगी छान वाटत असले तरी यांच्या संमोहनामुळे बळी पडलेल्यांची अनेक प्रकरणे मी स्वत: हाताळली आहेत. विद्यार्थ्यांना जर ‘मन व्यवस्थापना’चे धडे ही संस्था देणार असेल तर विद्यार्थी स्वातंत्र गमावले जाण्याची दाट शक्यता आहे. ब्रह्माकुमारीचे तत्त्वज्ञान हे विवाहनंतरच्याही शारीरिक संबंधाला नकार देते. ही गोष्ट वाईट आहे असेच सांगितले जाते. त्यामुळे अशा कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात सामान्य जीवन जगण्याबाबत शंका निर्माण होऊ शकते. 

– श्याम मानव, संस्थापक, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती.

नवीन शिक्षण धोरणाने कौशल्य विकास अभ्यासक्रमांवर अधिक भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘मन व्यवस्थापन’ अभ्यासक्रम सुरू केला आहे. अनेकांना मन:शांतीची गरज असून विद्यार्थ्यांना याचे ज्ञान मिळावे हा यामागचा उद्देश आहे. यात ब्रह्माकुमारी संस्थेची निवड करण्यात आली असली तरी त्यांचा धार्मिकतेशी काहीही संबंध नाही. विद्यार्थ्यांना केवळ ध्यान, योग अशा मन:शांतीचे शिक्षण ही संस्था देणार आहे. 

– डॉ. संगीता मेश्राम, इतिहास विभाग प्रमुख, नागपूर विद्यापीठ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmakumari lessons at nagpur university opt for mind management course ysh
First published on: 08-12-2022 at 00:02 IST