देशात राजकीय व्यवस्थेवर भांडवलवादी आणि ब्राम्हणवादी यांच्या घातक युतीचे साम्राज्य असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाणून पाडण्यासाठी प्रत्येक घरातून मुलांमध्ये वीरभाव निर्माण करून व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पिढी तयार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू महाविद्यालयातील प्राध्यापक रतनलाल यांनी केले.

आंबेडकरी प्रबोधन मंच यांच्यावतीने ‘स्वतंत्र भारतात एससी/एसटीची दुर्दशा व स्वतंत्र मतदार संघाची आवश्यकता’ या विषयावर रविवारी दीक्षाभूमी सभागृहात परिसंवाद झाला. त्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बौद्ध चिंतक शांतीस्वरूप बौद्ध, आंबेडकरी साहित्यिक राहुल वानखेडे उपस्थित होते.

विद्यमान स्थितीत भांडलवाद आणि ब्राम्हणवाद यांची अभद्र युती झाली आहे. या दोन्ही व्यवस्थेचे समान गुणधर्म आहेत. भांडवादी वर्गव्यवस्थेवर बोलण्यास मनाई करतो आणि ब्राम्हणवादी जातीव्यवस्थेवर बोलण्यास हरकत घेतात, असे सांगून रतनलाल म्हणाले की, ते एसी/एसटी, मागासवर्गीय लोकांना मुस्लिमांप्रमाणे देशातून घालवण्याची भाषा करणार नाहीत, परंतु त्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणजे कामगार बनवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्याकडून राष्ट्रवादाच्या गप्पा केल्या जात आहेत.

यातील ‘राष्ट्र’ एससी, एसटी आणि ओबीसींचे, परंतु ‘वाद’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चालणार आहे. ही स्थिती बदलण्यासाठी मध्यमर्गीयांनी राजकारणापासून अलिप्तता बागळू नये. केवळ आयएसएस, आयपीएस झाल्याने प्रश्न सुटणार नाहीत. ही आपली लढाई आत्मसन्मानाची आणि स्वाभिमानाची आहे. समान हक्क मिळवण्याची आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

या देशातील प्रत्येकजण बौद्ध परिवारातील आहे. हे ऐतिहासिक सत्य समाजापर्यंत जोपर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत ‘जनता हमारी आणि सफलता की गॅरन्टी उनकी’ हे चित्र पालटणार नाही, असे बौद्ध विचारक शांतीस्वरूप बौद्ध म्हणाले. डॉ. आंबेडकर यांच्यामुळे चांगल्या वेतनाची, सन्मानाची नोकरी मिळाली, पण समाजाचे आपण काही देणे लागतो हे समजून एससी, एसटी, ओबीसींना एकत्रित करा. आपले शत्रू समाजात भ्रम पसरवतात. यासाठी सर्वानी एकत्रित होणे गरजे आहे, असेही ते म्हणाले.

स्वतंत्र मतदारसंघाशिवाय पर्याय नाही – वानखेडे

आरक्षित मतदारसंघातील प्रतिनिधी अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करीत नसेल तर अशी लोकशाही कोणत्या कामाची, असा सवाल आंबेडकरी साहित्यिक राहुल वानखेडे यांनी केला. अनुसूचित जातीसाठी कागदोपत्री मतदारसंघ आरक्षित आहे. तेथील उमेदवार अनुसूचित जातीचा असला तरी तो सर्वणांसाठी काम करतो. हे दुटप्पी धोरण बदलले गेले पाहिजे. एससीसाठी आरक्षित मतदारसंघात इतर लोक मतदार कशासाठी, आमचा उमेदवार आम्हाला निवडण्याचे अधिकार हवे. यामुळेच लोकसभेचे १३०सदस्य एससी, एसटीचे प्रतिनिधित्व करूनही त्यांचे प्रश्न सुटत नाही. कारण त्यांना इतर लोकांनी मतदान केलेले असते. ही स्थिती बदलण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ हाच एकमेव पर्याय आहे, असेही ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brahmanical and capitalist nexus says professor ratanlal
First published on: 21-08-2017 at 01:49 IST