चंद्रपूर : नवतपाच्या प्रारंभीच ब्रह्मपुरी शहराने उष्णतेचे नवे विक्रम नोंदविले आहेत. सोमवारी ब्रह्मपुरी येथे तब्बल ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग पाचव्या दिवशी शहरातील तापमान ४७ अंशांच्या पुढे गेल्याने नागरिक अक्षरशः उष्णतेच्या विळख्यात सापडले आहेत.
ब्रह्मपुरीतील हे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान असल्याची माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. वाढत्या उष्णतेमुळे शहरात दुपारच्या सुमारास संचारबंदीप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असून, रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. नवतपाला सुरुवात झाल्यानंतर विदर्भासह जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, ब्रह्मपुरी शहरातील तापमानाने यंदा सर्वांचेच लक्ष वेधले आहे. गुरुवारी येथे ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी तापमान ४७.२ अंशांवर पोहोचले. शनिवारी पुन्हा ४७.१ अंश तापमान कायम राहिले, तर रविवारी ते ४७.२ अंशांवर गेले. सोमवारी नवतपाच्या पहिल्याच दिवशी तापमानाने ४७.६ अंशांचा उच्चांक गाठला.
रविवारी ब्रह्मपुरी हे जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असल्याची चर्चा होती. सोमवारी मात्र देशात प्रथम, तर जागतिक स्तरावर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उष्ण शहर म्हणून ब्रह्मपुरीची नोंद झाल्याचे सांगितले जात आहे. ब्रह्मपुरीपाठोपाठ चंद्रपूर शहरातही तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, अत्यावश्यक कामांशिवाय लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुपारच्या वेळी बाजारपेठा, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी शुकशुकाट दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा, पुरेसे पाणी पिण्याचा आणि उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
