नागपूर : वाघ आणि मानव संघर्ष सर्वाधिक असणाऱ्या ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सुमारे १५० वाघांचा वावर आहे. ती वाघांची मार्गिका देखील आहे. मात्र, या वनक्षेत्रात लोहखाण प्रकल्प आला तर तब्बल १५० वाघांचा अधिवास हिरावला जाईल. नुकताच थोडाफार कमी झालेला हा संघर्ष पुन्हा एकदा सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
राज्य वन्यजीव मंडळाने अलीकडेच हिरवी झेंडी दाखवलेल्या लोहारडोंगरी प्रकल्पामुळे वाघांचा अधिवास हिरावला जाणार आहे. सुरुवातीपासूनच वाघ आणि मानव या संघर्षामुळे ब्रह्मपुरी वनक्षेत्रात सर्वाधिक माणसे मृत्यमुखी पडली. अलीकडच्या काळात हा संघर्ष थोडा कमी झाला, पण तो पूर्णपणे संपला नाही.
या एकूणच विभागात सुमारे ६५०च्या जवळपास गावे असून त्यातील ३५० गावे जंगलाला लागून आहे. ब्रम्हपूरी वनक्षेत्रात उत्तर, दक्षिण तसेच नागभिड, तळोधी, सिंदेवाही असे अनेक उपवनक्षेत्र आहेत. ताडोबातील गाभा आणि बफर क्षेत्रातील वाघांची संख्या वाढल्यामुळे बरेचसे वाघ या वनक्षेत्रात स्थलांतरित होत आहेत. या परिसरातील वाघांची संख्या वाढण्यामागे आणखीही काही कारणे आहे.
दोन दशकांपूर्वी गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याने या परिसरातील वाघांची वाट अडवली. २००८च्या सुमारास वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्यानंतर त्यातील दोन जगायचे. आता त्यांनी हा अधिवास स्वीकारला असल्यामुळे ही चारही बछडे जिवंत राहतात. याशिवाय वाघीण मिलनासाठी तयार होत नसेल तर वाघ तिच्या बछड्यांना लक्ष्य करायचा. मात्र, बछड्यांना वाचवण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे बछडे असलेली वाघीण मिलनासाठी तयार होते.
त्यातून तिला पुन्हा मातृत्त्व प्राप्त होऊन ती आणखी बछड्यांना जन्म देते. यामुळे ब्रह्मपुरी वनक्षेत्रात वाघांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांना या परिसरात पुरेसे खाद्य उपलब्ध नसले तरी बदललेल्या अधिवासासोबतच त्यांनी खाद्य बदलले आहे. गावकऱ्यांची पाळीव जनावरेच त्यांचे खाद्य आहे. अशास्थितीत याठिकाणी खाण आली तर त्यांचे जे स्थलांतर आता सुरू झाले आहे ते थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी झालेला वाघ आणि मानव संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
ब्रह्मपुरी वनक्षेत्रात संख्या जास्त
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा आणि बफर क्षेत्रात नसतील एवढे वाघ एकट्या ब्रह्मपुरी वनक्षेत्रात आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्था आणि महाराष्ट्र वनविभागाच्या संयुक्त अभ्यासातून या वनक्षेत्रात सुमारे १५० वाघांचा वावर आढळून आला आहे. यात मोठ्या वाघांची संख्या ६५ असून त्यातील ४३ वाघिणी आहेत. सुमारे ७०च्या जवळपास वाघांचे बछडे आहेत. तर उपवयस्क वाघांची संख्याही १७च्या आसपास आहे.

