अकोला : ब्राह्मण समाजाला राजकीय पक्षांकडून लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळत नाही. अनेक वेळा केवळ मतांसाठी वापर करून घेतला जातो. समाजाला गृहीत धरल्या जाते. हे चित्र बदलण्यासाठी सर्वपक्षातील ब्राह्मण नेत्यांना एकत्रित करून राजकीय दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने लवकरच पुण्यात एक मेळावा घेतला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुळकर्णी यांनी दिली.
अकोल्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असतांना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी समाजाचे प्रश्न, भूमिका मांडून विविध मुद्द्यांवर भाष्य केले. प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, ‘अमृत’चे दीपक जोशी, राज्याचे संघटन मंत्री उदय महा, विदर्भाचे संघटन मंत्री रवींद्र टाकळकर, अक्षय गंगाखेडकर आदी उपस्थित होते.
ब्राह्मण समाजाच्या एकत्रिकरणाचे कार्य महासंघाकडून निरंतर सुरूच असते. शहरी भागात ब्राह्मण समाजाचे वास्तव्य अधिक प्रमाणात आहे. अनेक महापालिका क्षेत्रात १० टक्क्यापर्यंत ब्राह्मण समाजाची लोकसंख्या आढळते. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत १० टक्के ब्राह्मण समाजाला निवडणुकीत प्रतिनिधित्व देण्याची मागणी भाजपसह विविध राजकीय पक्षांकडे निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन भाजपने महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीमध्ये ८५ ब्राह्मण उमेदवार दिले. इतरही काही पक्षांनी ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व दिले, असे डॉ. गोविंद कुळकर्णी यांनी सांगितले.
उद्योग-व्यवसाय आणि राजकारणामध्ये आतापर्यंत ब्राह्मण समाज फारसा रस दाखवत नव्हता. मात्र, आता परिस्थिती बदलत चालली आहे. अनेक ब्राह्मण यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. राजकारणात सक्रिय ब्राह्मण नेत्यांची संख्या देखील वाढत असल्याचे आश्वासक चित्र दिसून येते. या पार्श्वभूमीवर त्यांना एकत्रित आणण्याची महासंघाची भूमिका आहे. त्यामुळे पुणे येथे लवकरच सर्वपक्षीय ब्राह्मण नेत्यांचा मेळावा घेण्यात येईल. त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना निमंत्रित केले जाईल, असे ते म्हणाले.
समाजासाठी बळकटीकरणासाठी विविध उपक्रम
ब्राह्मण समाजाच्या बळकटीकरणासाठी महासंघाचे व्यापक कार्य असून विविध उपक्रम राबविण्यात येतात. युवक, युवतींना मार्गदर्शन, रोजगार, उद्योजक मेळावे, गरीब गरजू कुटुंबांना मदत आदींसह विविध कार्याचा त्यात समावेश आहे. महासंघाचा विस्तारही झपाट्याने होत आहे. आज राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा मतदारसंघनिहाय शाखा स्थापन झाल्या आहेत. त्याच्या माध्यमातून तळागळात ब्राह्मण महासंघाचे कार्य केले जाते, अशी माहिती कुळकर्णी यांनी दिली.
