अमरावती: ‘ब्रेन ॲन्यूरिझम’ म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीच्या भिंती कमकुवत होऊन तिचे फुगणे, ज्यामुळे ती फुटल्यास रक्तस्त्रावाचा धोका असतो. तीव्र डोकेदुखी, चक्कर, मळमळ, बोलण्यात अडचण ही या आजारांची लक्षणे असू शकतात. यांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. यावरील शस्त्रक्रिया ही जटिल मानली जाते.
सुपर स्पेशालिटीत शस्त्रक्रिया यशस्वी
अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) प्रथमच मेंदूतील एन्युरिझम या गंभीर आजारावरील अत्यंत जटिल व जीव वाचविणारी ‘एन्युरिझम क्लिपिंग’ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. स्थानिक ४० वर्षीय रुग्णाला गेल्या ४-५ दिवसांपासून असह्य व तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता. नातेवाईकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णाची तपासणी व एमआरआय ब्रेन केल्यानंतर मेंदूतील रक्तवाहिनीत एन्युरिझम असल्याचे निदान झाले. रुग्णाच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात येताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने एन्युरिझम क्लिपिंग शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रिया विनामूल्य
ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची, आव्हानात्मक व उच्च दर्जाच्या कौशल्याची आवश्यकता असलेली असून, मेंदूतील रक्तवाहिनीवरील फुगवटा फुटण्यापासून रोखण्यासाठी विशेष क्लिप लावण्यात येते. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. ही शस्त्रक्रिया आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली.
डॉक्टरांचे यशस्वी प्रयत्न
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रियेसाठी डॉ. योगेश सवदेकर, डॉ. अंकुश वानखेडे, डॉ. वैशाली धांडे आणि डॉ. श्रीकांत शेगोकार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भूलतज्ज्ञ डॉ. राखी वानखेडे, डॉ. बाळकृष्ण बागवले, डॉ. दिपाली देशमुख, डॉ.अश्विनी मडावी, डॉ.उज्ज्वला मोहोड, डॉ. रोहिणी राठोड समाजसेवा अधीक्षक शितल बोंडे, डॉ. दिव्यांनी मुंदाणे, डॉ.पायल रोकडे, अधिसेविका माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर दिपाली देशमुख, मनीषा रामटेके, शुभम गवई, स्नेहल काळे, यश गवई, विजय गवई, मंगेश लांजेवार, वेदांत इंदुरकर, राहुल कावनपुरे यांचे सहकार्य लाभले.
तातडीचे उपचार महत्त्वाचे
या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे अमरावती विभागातील रुग्णांना मेंदूतील एन्युरिझम सारख्या गंभीर आजारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू किंवा कायम अपंगत्व येऊ शकते. वेळेवर निदान व तातडीचे उपचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित न्यूरोसर्जनचा सल्ला घ्यावा, असे डॉ. अंकुश वानखेडे यांनी सांगितले.
