वैद्यकीय शिक्षण व विभागीय आयुक्तांची वेगवेगळी बैठक

नागपूर : पूर्व विदर्भातील सर्व रुग्णालयांमध्ये अद्यावत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या विषयावर विभागीय आयुक्त कार्यालयाने सहा जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकाऱ्यांसोबत तर वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आयुक्तांनीही राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या विषयावर राज्यातील सर्व अधिष्ठात्यांसोबत मंगळवारी बैठक घेतली. त्यात या प्रकल्पाच्या विद्यमान स्थितीसह अडचणी जाणून घेण्यात आल्या. तातडीने समस्या सोडवून ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या सूचना याप्रसंगी दिल्या गेल्या.

नागपूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी येथील ५३ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अग्निशमन व विद्युत अंकेक्षण होऊन त्रुटी दुरही करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्यात असल्याचे सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक हद्दीतील ग्रामीण रुग्णालयांतील कामाचीही स्थिती चांगले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांना तातडीने अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी दुर करण्याचे नागपूर महापालिकेने पत्र दिले असून तेही काम लवकरच होण्याची आशा महापालिकेकडून वर्तवली गेली. तर जिल्ह्य़ातील इतरही रुग्णालयांची स्थितीवर येथे मंथन केले गेले. तातडीने ही यंत्रणा कार्यान्वित करा, गरजेनुसार प्रस्ताव सादर करा, तातडीने निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. इतरही जिल्ह्य़ांचा यावेळी आढावा घेण्यात आला. दुसऱ्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आयुक्तांना नागपूरच्या मेडिकल महाविद्यालयातील करोना रुग्णांशी संबंधित ट्रामा केअर सेंटर आणि अतिदक्षता विभागातील अद्यावत अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून गैरकरोनाच्या वार्डासह सुपरस्पेशालिटी रुग्णालयात ही यंत्रणा करण्यासाठी २० कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात आले. त्यातच २० कोटींच्या कामासाठीही प्रशासकीय मान्यता मिळाली असून तातडीने निधीची मागणी केली गेली. मेयोसह इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील या यंत्रणेच्या स्थितीची माहिती यावेळी घेतली गेली.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमी वर विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या बैठकीत नागपूर जिल्ह्य़ातील सर्व रुग्णालयांतील अद्यावत स्थिती कळवण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेसह ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयांतील निम्म्या रुग्णालयांतील कामे पूर्ण झाली असून इतरांचेही काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले. या कामासाठी प्रशासनाकडून निधीची कमतरता पडू देणार नाही. हे काम प्राधान्यानेच केले जाईल.

विमला आर. जिल्हाधिकारी, नागपूर.