scorecardresearch

गोंदिया : लग्न दारात अन नवरदेव स्वच्छता अभियानात, नागरिकांकडून कौतुक

रविवार २६ मार्च रोजी याच मोहिमेत चक्क नवरदेवाने सहभागी होऊन गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

bridegroom yashwant chute
लग्न दारात अन नवरदेव स्वच्छता अभियानात

गोंदिया : ‘रविवारचे दोन तास गावासाठी, गावच्या समृद्धीसाठी’ या अभिनव संकल्पनेतून सालेकसा तालुक्यातील भजेपार येथे दर रविवारी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रविवार २६ मार्च रोजी याच मोहिमेत चक्क नवरदेवाने सहभागी होऊन गावकऱ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.

मोहिमेच्या चौथ्या आठवड्यात स्वच्छता दूत भजेपार अंतर्गत माताटोला येथे दाखल होताच तेथील तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम सुरू केली. दरम्यान, नागरिकांचा आणि विशेषतः युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गावातील हनुमान मंदिरापासून माताबोडी परिसर तथा बोरवेल आणि विहिरीचे ओटे स्वच्छ करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये माती घालण्यात आली. या मोहिमेत इतर युवकांसह नवरदेव यशवंत चुटे हा युवकही सहभागी झाला. तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. लग्नाला जाण्यापूर्वी स्वच्छतेला प्राधान्य देणाऱ्या या युवकाने जणू गावकऱ्यांना स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे पटवून दिले.

हेही वाचा >>> “चोराला चोर म्हणणार, वारंवार म्हणणार” राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यावर नाना पटोले संतप्त; म्हणाले “षडयंत्र…”

यावेळी सरपंच चंद्रकुमार बहेकार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बबलू बहेकार, ग्रा.पं. सदस्य आत्माराम मेंढे, रोजगार सेवक गोपाल मेंढे सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रत्येक आठवड्याला रविवारच्या सुट्टीचा दिवस सत्कार्यासाठी घालण्याच्या उद्देशाने कुठल्याही एका परिसराची निवड करून गावातील युवक व नागरिक ग्राम स्वच्छता अभियान राबवत असून या मोहिमेला आता हळूहळू लोकचळवळीचे स्वरूप येत आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा: देवदर्शनाला निघाले अन्… भीषण अपघातात बालकाचा मृत्यू, पाच गंभीर

स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी

गावाची समृद्धी, विकास आणि आरोग्य हे ग्राम स्वच्छतेवर अवलंबून आहे. त्यामुळे स्वच्छता ही केवळ प्रशासनाचे काम न राहता लोकचळवळ व्हायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने गावा गावात समृद्धी येईल. प्रत्येक व्यक्तीने वेळ काढून या मोहिमेत आपली भूमिका निभावली पाहिजे. ग्राम स्वच्छता अभियान हा उपक्रम प्रशंसनीय आहे.

– यशवंत चुटे, नवरदेव.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या