तीन लाखांची मागणी; बाह्य़स्त्रोत कंपनीविरुद्ध तक्रार

महेश बोकडे

नागपूर : राज्यातील एकमात्र अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगारांकडून पैसे लाटणारी टोळी सक्रिय आहे. एम्सला मनुष्यबळ पुरवणाऱ्या एका बाह्य़स्त्रोत कंपनीविरोधात रुग्णालय प्रशासनाकडे एक तक्रार आल्याने हा प्रकार पुढे आला. एम्स प्रशासनाने त्यावर नव्याने मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपनीसाठी निविदा काढल्याची माहिती आहे.

देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरातील नावाजलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये ‘एम्स’चाही समावेश आहे. नुकताच एम्सने तृतीय वर्धापनदिन समारंभ साजरा केला. येथे सध्या औषधशास्त्र, हृदयरोग, अस्थिरोग, कान- नाक- घसा रोग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, बालरोग विभाग, नवजात शिशुरोग विभाग, दंतचिकित्सा विभाग, नेफ्रोलॉजी विभागासह इतरही काही विभाग सुरू झाले. येथे चांगल्या सेवा मिळत असल्याने सातत्याने बाह्य़रुग्ण विभागासह आंतरुग्ण विभागातही रुग्णसंख्या वाढत आहे.

त्यातच एम्स प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने येथे नवीन विभाग सुरू करण्यासाठी विविध विषयांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्तीही केली जाते. त्यानुसार लवकरच येथे युरोलॉजी, न्युरोलॉजी,हृदय शल्यचिकित्सा विषयातील तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न आहे.

दरम्यान, एम्स प्रशासाने येथे रुग्णांना चांगल्या सेवा मिळाव्या म्हणून मदतनीस, रिसेप्शनिस्ट, फार्मासिस्ट, एक्सरे तंत्रज्ञ, डीटीपी ऑपरेटरसह इतरही अनेक लिपिकाच्या गटातील कामासाठी बाह्य़स्त्रोत मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. पैकी एका कंपनीकडून नोकरीवर लावून देण्यासाठी दोन ते तीन लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार काहींनी थेट एम्सच्या संचालकांनाच केली आहे. या उमेदवारांकडून पैसे लाटण्यासाठी पुढे ते कायम होण्याची आशा असल्याचेही या कंपनीचे दलाल भासवत आहेत.

या तक्रारीचे गांभीर्य बघत एम्सकडून लवकरच येथे मनुष्यबळ पुरवणाऱ्या नवीन कंपनीसाठी नव्याने जाहिरात काढली जाणार आहे. परंतु आता येथील बाह्य़स्त्रोत कंपन्यांवरही बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी एम्स प्रशासनावर आली आहे.

बाह्य़स्त्रोत कर्मचाऱ्यांच्या नोकरीसाठी पैशाची मागणी केली गेल्याची एक तक्रार एम्स प्रशासनाला मिळाली आहे. प्रत्यक्षात या कंपनीकडून नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रक्रियेत एम्सचा काहीही संबंध नसतो. घटनेचे गांभीर्य बघत बाह्य़स्त्रोत कर्मचारी पुरवणाऱ्या नवीन कंपनीसाठी प्रशासनाने निविदा काढली आहे. दरम्यान, या पद्धतीने येथे नोकरी मिळत नसून कुणीही तरुणाने कोणालाही पैसे देऊ नये.

– मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता, संचालिका, एम्स (नागपूर)