लोकसत्ता टीम गडचिरोली : आठ वर्षांपूर्वी हिंसक नक्षलवादी चळवळ सोडून गावी शेती करणाऱ्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या केली. हा थरार भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे २६ जुलै रोजी पहाटे घडला. नक्षल साप्ताहच्या पार्श्वभूमीवर दक्षिण गडचिरोलीत नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे चित्र आहे. जयराम कोमटी गावडे (४०,रा. आरेवाडा ता. भामरागड) असे मृताचे नाव आहे. तो पूर्वी नक्षलवाद्यांसाठी काम करायचा. मात्र, २०१६ मध्ये पत्नीसह आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर तो गावी शेती करत होता. छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील वांडोली जंगल परिसरात १७ जुलै रोजी पोलिस व माओवाद्यांत चकमक उडाली होती. यात पोलिसांच्या सी- ६० जवानांनी माओवाद्यांना जशास तसे उत्तर दिले होते. यात १२ नक्षलवादी ठार झाले होते तर एक पोलीस अधिकारी व दोन जवान जखमी झाले होते. दरम्यान, यानंतर नक्षलवादी बिथरले असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून जयराम गावडे यास अत्यंत निर्दयीपणे गोळ्या झाडून संपविले. त्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. आणखी वाचा-‘एमपीएससी’ दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करणार! नक्षल सप्ताहाच्या तोंडावर घटना दरम्यान, २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान दरवर्षी माओवादी नक्षल सप्ताह पाळतात. या दरम्यान जवानांवर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, रस्ते बंद करणे, पत्रक टाकणे असे प्रकार होत असतात. त्याआधीच पोलिस खबरी असल्याच्या संशयातून आत्मसमर्पित नक्षलवाद्यालास संपविल्याच्या घटनेने पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे नक्षलवादी चळवळ अस्वस्थ ? गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे मागील दोन वर्षांत २२ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शिवाय काही जहाल नक्षल्यांना चकमकीत पोलिसांच्या गोळीचा निशाणा व्हावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीची पिछेहाट सुरू आहे. मागील महिन्यात नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्छु याने पत्नी संगीता ऊर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. गिरीधर हा कंपनी १० चा प्रमुख होता. त्यामुळे या दलममध्ये अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. आणखी वाचा-अकोला : कृषी कर्ज पुरवठ्याला हवे ‘कॅश क्रेडिट’, खा. अनुप धोत्रे यांची केंद्र सरकारकडे मागणी काही दिवसांपूर्वी वांडोली येथे झालेल्या चकमकीत तीन मोठ्या नेत्यांसह १२ जहाल नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. आरेवाडातील घटनेची चौकशी सुरु आहे. नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. आत्मसमर्पण हाच नक्षलवाद्यांना एकमेव पर्याय आहे, त्यामुळे त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून अजूनही मुख्य प्रवाहात सामील व्हावे. -नीलोत्पल, पोलीस अधीक्षक