बीटींना जाऊन आता दीड महिना होत आला. ठिकठिकाणी त्यांच्या श्रद्धांजली सभा पार पडल्या. यात अनेकांनी पुढाकार घेतला. त्यात प्राध्यापक होते, त्यांच्या संघटना होत्या. शाळा, महाविद्यालये होती, त्यांचे व्यवस्थापन करणारे संस्थाचालक होते. सर्वांनी बीटींच्या कार्याला यातून उजाळा दिला. त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी केलेले काम, विदर्भाच्या विकासासाठी दिलेला लढा, प्राध्यापकांच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलने याच्या आठवणी या निमित्ताने निघाल्या. बीटी देशमुख मोठे होतेच, त्यांच्या कार्याचे स्मरण करावे तेवढे थोडेच पण आता ते गेल्यावर काय? त्यांचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व प्राध्यापकांमधून त्यांच्या हयातीत उभे राहू शकले नाही. आता ते गेल्यावर उभे राहण्याची सूतराम शक्यता सध्यातरी दिसत नाही. या वास्तवाचे काय? श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होणारे शिक्षण क्षेत्रातले लोक, विशेष करून प्राध्यापक यावर गंभीरपणे विचार करणार आहेत का? बीटी द्रष्टे होते. केवळ शिकवणे हे प्राध्यापकांचे काम नाही. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी व्हायला हवा असे ते म्हणायचे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक. प्रत्येक ठिकाणी प्राध्यापकांनी दिशादर्शक म्हणून वावरले पाहिजे अशी त्यांची भूमिका. आज ती कितीजण पार पाडताना दिसतात? असे सक्रिय असलेले प्राध्यापक बोटावर मोजण्याएवढे तरी आहेत का? नव्वदच्या दशकात प्राध्यापकांचे पगार फार कमी होते. ते वाढवे म्हणून लढा देणारे बीटीच. त्यावेळी ते म्हणायचे, प्राध्यापकाला समाजसेवा, संशोधन करता यावे यासाठी तो आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे गरजेचे. त्याला नुसती नवी पिढीच घडवायची नाही तर चांगला समाजही घडवायचा असतो. हे तत्त्व सरकारने मान्य केले व चौथ्या वेतन आयोगापासून प्राध्यापकांचा पगार कमालीचा वाढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या पगाराएवढा. या तत्त्वाला आजवर किती प्राध्यापक जागले? उलट भरपूर पगारवाढ झाल्यावर प्राध्यापकांची जमात जास्त एकलकोंडी होत गेली. समाजाशी फटकून वागू लागली. मी व माझे कुटुंब असा बुरसटलेला मध्यमवर्गीय विचार करू लागली. हा बीटींचा स्वप्नभंग नाही का?
कामकाजाचे तास कमी व वेतन जास्त अशी सुविधा वाट्याला येणारा एकमेव वर्ग प्राध्यापकांचा. याचा फायदा घेत कितीजण संशोधन व समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय झाले व त्यातल्या कितींना यश मिळाले याचे उत्तर आज शोधूनही सापडत नाही. काही सन्माननीय अपवाद असतीलही पण ते बीटींचा वारसा चालवण्यासाठी पुरेसे समजायचे का? बीटी आमदार झाले. त्यामुळे लढण्यासाठी त्यांना आणखी एक आयुध प्राप्त झाले. प्रत्येक प्राध्यापक काही आमदार होऊ शकत नाही पण एक सुशिक्षित व्यक्ती म्हणून विदर्भाला भेडसावणारे प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सहज मांडू शकतो. आजवर किती जणांनी ही जबाबदारी पार पाडली? आजही प्राध्यापक लिहितात पण कशासाठी तर पदोन्नतीसाठी आवश्यक असलेले गुण मिळवण्यासाठी. त्यांच्याकडून तयार होणारे संशोधनपर लेख संदर्भासहित चोरीच्या मजकुरावर आधारलेले असतात. त्यात सखोल अभ्यासांती मांडलेला नवा विचार, तर्कसंगत विवेचन तसेच विश्लेषणाची वानवा असते. त्यामुळे हे लेख वाचकांचे साधे कुतूहलही जागृत करू शकत नाहीत. अशी जमात बीटींना अपेक्षित होती काय? बीटींनी विदर्भाच्या अनेक प्रश्नांना हात घातला. त्यावर आधारित सकस लेखांची मांडणी करून सरकारचे लक्ष वेधले. लोकप्रतिनिधी या नात्याने नंतर आंदोलनही केले. आंदोलनाचे सोडा पण प्राध्यापकांनी अशी मांडणी तरी करण्याचा प्रयत्न केला काय? आताच्या काळात सरकारविरोधी सूर लावणे कठीण झाले हे मान्य पण प्रदेशाचे मागासलेपण व विकासाच्या मुद्यावर भूमिका मांडायला प्राध्यापकांना कुणी रोखले आहे? नसेल तर मग ही मंडळी समोर का येत नाही? आत्ममग्नतेत का वावरते? एकीकडे काहीही करायचे नाही व बीटींच्या आदर्शाचे गोडवे गायचे ही त्यांच्या विचाराशी केलेली प्रतारणा नाही का? बीटींनी नुटा ही संघटना उभारली. एकेकाळी नुटाचा राज्यभर दबदबा होता. हे करताना बीटींनी कधीही जातपात, धर्माला महत्त्व दिले नाही. एकच वर्ग तो म्हणजे प्राध्यापकांचा अशीच त्यांची भूमिका राहिली. नंतर हळूहळू प्राध्यापकांच्या वेगवेगळ्या संघटना उभ्या राहू लागल्या. उजव्या, डाव्या विचारांची वेगळी असे त्याला स्वरूप आले. पुढे त्याचा विस्तार झाला व जातींच्या संघटना उदयाला आल्या. बहुजनवादी वेगळे, आंबेडकरवादी वेगळे. अभिजनांची स्वतंत्र संघटना. हे सारे बीटींना त्यांच्या हयातीतच वेदना देणारे होते. तरीही त्यांनी यावर कधी चकार शब्द काढला नाही. नुटा मान्य नसेल तर दुसऱ्या माध्यमातून लढा, पण लढणे थांबवू नका असाच त्यामागचा विचार होता. प्रत्यक्षात झाले काय तर संघटनांची गर्दी वाढल्याने एकीकरणात असलेली ताकदच विभागली गेली. हा माझा, तो तुझा असा स्वार्थी विचार प्रत्येकाच्या मनात येत गेला व या सर्व संघटनांचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. आता तर लढण्याची ताकद गमावून बसलेल्या या संघटनांना कुणी हिंग लावूनही विचारत नाही. एकूणच बीटींच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला. यातून येणारी खिन्नता ते बरेचदा बोलूनही दाखवायचे. त्यांच्या हयातीतच प्राध्यापकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवलेली. आता तेच लोक बीटी गेल्यावर गळे काढताना दिसतात. याला काय म्हणायचे?
विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आपणही बीटींच्या मार्गदर्शनात एखादा अभ्यासप्रकल्प हाती घ्यावा असे विदर्भातील किती प्राध्यापकांना वाटले? कोणत्याही मागास प्रदेशाचा विकास केवळ राजकीय व्यासपीठ वापरून होत नाही. यासंबंधीच्या प्रश्नांची चर्चा जोवर साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व्यासपीठांवर होत नाही तोवर त्याला वजन प्राप्त होत नाही. सरकारवरचा दबाव सुद्धा या सर्व व्यासपीठाच्या एकत्रीकरणातून वाढतो. हा अनुभव अनेकदा आलेला. दुर्दैवाने बीटीनंतर एकही प्राध्यापक असे प्रश्न घेऊन उभा राहू शकला नाही. ही विदर्भाची शोकांतिका नाही काय? प्राध्यापक केवळ शिक्षणातच सक्रिय असून चालत नाही तर तो समाजकारणातही सक्रिय असायला हवा. तरच भविष्याचा वेध घेणारे विद्यार्थी घडतात व समाजही जागरूक होत जातो. बीटींच्या कार्याची प्रेरणा नेमकी ही होती. त्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न किती प्राध्यापकांनी आजवर केला? आज जुने निवृत्तिवेतन, नवीन शिक्षण प्रणाली, विद्यार्थ्यांची आंदोलने असे अनेक नवीन मुद्दे प्राध्यापकांसमोर आहेत. त्यावर कितीजण व्यक्त होतात? कोणत्या संघटना यावर ठाम भूमिका घेताना दिसतात तर कुणीच नाही. एवढे मौन बाळगणारे प्राध्यापक असतील तर समाजसुधारणा तर दूरच राहिली पण चांगले विद्यार्थी सुद्धा घडू शकत नाहीत. हे वास्तव या वर्गाला मान्य आहे का? बीटींविषयी संवेदना व्यक्त करणे योग्यच पण त्यांचे काम पुढे नेण्यासाठी पुढाकार घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. तशी हिंमत हा वर्ग दाखवणार काय?

devendra.gawande@expressindia.com