जयंती उत्सव म्हटलं की त्या विशिष्ट जाती, धर्मियांचाच सहभाग, बाकीचे अलिप्त असे शहरीच काय ग्रामीण भागातीलही चित्र आहे. मात्र, आंबे टाकळी (ता. खामगाव) या गावातील गावकऱ्यांना ही बाब मान्यच नसून त्यांनी सर्वसमावेशक जयंतीची वेगळी आणि आदर्श परंपरा निर्माण केली आहे.

पाच हजार लोक संख्येच्या या गावात मराठा, कुणबी, माळी, बौद्ध, चर्मकार, मातंग समाजाचे  ग्रामस्थ राहतात. आज बुद्ध जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात देखील हे सुखद चित्र  दिसून आले. आज गावात बुद्ध विहार लोकार्पण आणि बुद्ध मूर्तीची केली प्रतिष्ठापना करण्यात आली. गावात विहार निर्मितीसाठी सर्व जातीधर्माच्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. दोन वर्षांपासून निर्माणाधिन असलेल्या या टुमदार विहाराचे आज गावातील सर्वधर्मीयांच्या साक्षीने लोकार्पण करण्यात आले.थायलंड मधून आलेल्या तथागतांच्या मूर्तीची विहारात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विहारात बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, महात्मा फुले, सावित्रीबाई यांचे अर्धपुतळे आहेत.  यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सर्व धर्मीय नवीन वस्त्रे घालून एकदिलाने सहभागी झाले. ‘बुद्धम् शरणम् गच्छामी’ चा निनाद करत निघालेल्या ग्राम प्रदक्षिणा नंतर भदंत राजज्योती यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भदंत राज रतन, भदंत धम्मसेन, भदंत प्रज्ञाज्योती उपस्थित होते.

विहार, जयंती उत्सवांचा केंद्रबिंदू

गावातील बुद्ध विहार आंबेडकर जयंतीच नव्हे तर शिवजयंती,  फुले दांपत्य, अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास जयंती उत्सवाचा केंद्र बिंदू राहतो. मिरवणुकीची सुरुवात किंवा समारोप विहारातच  होतो. सरपंच सुधाकर धोटे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यात सर्वजण सहभागी होतात. येथील भीमजयंतीचा थाट वेगळाच राहतो.  समाज बांधव वर्गणी गोळा करतात.  त्यानंतर  विहारातुन ध्वनीवर्धक वरून वर्गणी सुरू झाल्याची घोषणा केली की, इतर समाज बांधव स्वखुशीने वर्गणी आणून देतात परिसरातील आठ दहा गावातील समाज बांधव इथे जमा होऊन जयंती साजरी करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लग्नातही सर्वधर्मीयांचे धमाल नृत्य

या गावातील लग्नाच्या वरातीही सर्वसमावेशकतेची परंपरा जोपासली जाते. गावात जाती निहाय वस्त्या आहेत. वस्तीनुसार वरातीत शिवराय, आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावरील गाणी लावली जातात. या वरातीत सर्व जातीय युवक, गावकरी धमाल नृत्य करतात.