बुलढाणा : ‘त्या’ बेवारस व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंगावरील खाणाखुणांमुळे तो हिंदूधर्मीय असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला… अशावेळी धावून आलेल्या बौद्ध व मुस्लीम व्यक्तींनी त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. सामान्य भारतीय धर्मनिरपेक्षच आहेत, संकटात भारतीयांमधील भेदाभेदाच्या कृत्रिम भिंती पडून जातात आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे सिद्ध करणारा हा भावस्पर्शी घटनाक्रम बुलढाणा नगरीत भाऊबीजेच्या पवित्रदिनी २६ ऑक्टोबरला घडला. विशेष म्हणजे, या आदर्श कृतीत सहभागी समाजसेवींनी याचा कोणताही गवगवा केला नाही. हेही वाचा : वायू प्रदूषण नियंत्रक यंत्राच्या कार्यक्षमतेचे परीक्षण करण्यासाठी याचिका; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचा सुनावणीस नकार जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी एका बेवारस व्यक्तीचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे त्याचा मृतदेह जपून ठेवण्यात आला. भाऊ - बीजेला दिव्या फाऊंडेशनचे अशोक काकडे यांच्यासोबत संपर्क साधून कर्मचाऱ्यांनी निधनाची माहिती दिली. त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांना याची कल्पना दिली. काकस यांचे सहकारी सईद ठेकेदार व सलीम हाजीसाब यांनीही अंत्यसंस्कारासाठी तयारी दाखवली. मृताच्या अंगावरील गोंदवल्याची खूण, करदोडा यावरून तो हिंदू असल्याचे निष्पन्न झाले होते. चौघांनी सर्व तजवीज करून अनोळखी पार्थिवावर हिंदू पद्धतीने संगम तलावानजीकच्या स्मशानभूमीत दहन केले. मात्र, या चौघांनी याची प्रसिद्धी वा गाजावाजा करणे टाळले. याची चर्चा झाल्यावर प्रस्तुत प्रतिनिधीसोबत बोलताना दत्ता काकस यांनी माहिती दिली.