बुलढाणा: बातमीचे शीर्षक वाचून लाखो बुलढाणा जिल्हावासी दचकणे, भयभीत होणे स्वाभाविक आहे. याचे कारण चालू वर्षांत जिल्हावासियांनी अकस्मात केस गळती, टक्कल पडणे बोटांची नखे गळून पडणे असे गूढ आजार अनुभवले. खामगाव, शेगाव तालुक्यातील टक्कलचा आजार घाटावरील चिखली, मेहकर तालुक्यातही पसरला. याला महिने लोटले तरी अजूनही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा अहवाल अजूनही लालफीतशाहीत अडकला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा घायकुतीला आल्या आहे. या पार्श्वभूमीवर आता मेहकर तालुक्यात हाताला भेगा पडण्याच्या आजाराची चर्चा सुरु झाली आहे. मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथील वीस गावाकऱ्यांना हाताला भेगा पडल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या.
केंद्रीय आरोग्य, आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांचा गृह मतदारसंघ असलेल्या गावातील हा प्रकार आहे. यामुळे आरोग्य यंत्रणानी भेगांची गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख मध्ये दाखल झाले. ह्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता जिल्हा स्तरावरील जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे, वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ.बालाजी आद्रट उपस्थित होते. स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी मिश्रा, आरोग्यसेवक, आरोग्य सेविका तथा गावातील सगळ्या आशा सेविका व ईतर कर्मचारी वृंद यांनी सदर तपासणी केली .
काय आहे नेमका आजार?
पथकाने २० रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल (एकझेमा पालमोप्लांटर केरटोडेर्मा वा पालमोप्लांटर पसोरिअसिस) हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील १२ महिने ते ५ वर्षांपासून आहेत. मागील १-२ वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ञांकडुन रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले .
सदर आजार हा संसर्गजन्य नाही. ह्या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही.विविध प्रकारच्या प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ( ऑटोम्मुने ) पध्दतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डाक्टर तांगडे यांनी सांगितले. दुसरीकडे सर्व रूग्णांनी घ्यावयाची काळजी व उपचार याबाबत सविस्तर मार्गदर्शन रुग्णांना व स्थानिक वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.