बुलढाणा: बुलढाणा आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. याचे पडसाद राजकारणात उमटत असतानाच त्याचे पडसाद अराजकीय कार्यक्रमात देखील उमटत आहे.
चिखलीच्या आक्रमक आमदार आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले यांचा ४९ वा वाढदिवस आणि सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण निमित्त बुलढाण्यात अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त बुलढाण्यात लावण्यात आलेल्या होर्डिंग वरून बुलढाण्यात वाद निर्माण झाला. हा वाद थेट पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यानी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राजकीय वाद चिघळला
बुलढाणा विधानसभा मतदारसंघांचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील सुप्त राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आमदार गायकवाड आणि त्यांचे चिरंजीव तथा बुलढाणा पालिका सदस्य कुणाल गायकवाड यांनी यांनी चिखली मतदारसंघ पालथा घालून शिवसेनेचे संघटन वाढविण्याची मोहीम उघडली आहे. मागील अनेक महिन्यापासून सुरु असलेल्या या मोहिमेत शिंदे सेनेच्या शाखा उघडणे, ईतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश, जंगी कार्यक्रम घेण्याचा धडाका लावण्यात आला आहे. यामुळे आता आमदार श्वेता महाले यांनीही बुलढाणा मतदारसंघात ‘लक्ष घालण्यास ‘ सुरु केले आहे.
फलक लवण्यावरून वाद
आमदार महाले यांचे पती तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वीय सहायक विद्याधर महाले जयस्तंभ चौकात सुध्दा मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे.या होर्डिंग्ज वरून वाद निर्माण होऊन बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. शहरातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे फलक लावण्यावरून मध्यरात्री जोरदार वाद झाल्याची घटना घडली.
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बुलढाणा शहर पोलिसांनी विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबतच्या सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
काय झाले नेमके?
विद्याधर महाले मित्रमंडळाचे सदस्य मंदार बाहेकर हे प्रमोद गावंडे, मुन्नाभाऊ बेंडवाल, कौस्तुभ पाटील आणि मजुरांसह ३० ऑगस्टच्या मध्यरात्री साडेबारा वाजता जयस्तंभ चौकातील गांधी भवनासमोर पोस्टर लावत होते. नगर परिषदेची परवानगी घेऊन हे काम सुरू असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.याचवेळी एका पांढऱ्या स्विफ्ट डिझायरमधून तीन ते चार जण उतरले. दुसऱ्या बाजूने विक्की आव्हाड आणि त्याच्यासोबत आणखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. “तुम्ही पोस्टर कसे लावता?” असा जाब विचारत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि कार्यकर्ते व मजुरांना पोस्टर लावण्यापासून रोखल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९, २९६ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन वाघमोडे करीत आहेत.
