बुलढाणा : जनसंघाच्या काळापासून विविध ठिकाणी मिळेल त्या परिस्थितीमध्ये आपण भाजप कार्यालये चालवली. आज जगासह महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे. महाराष्ट्रात दीड कोटी ‘डिजिटली वेरिफाईड’ सदस्यांचे पाठबळ असलेला भाजप पक्ष आहे. भाजपच्या विचारांची पाळेमुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आधीपासूनच खोलवर रुजलेली आहे. येथील सर्व जुने नवे कार्यकर्तेच या कार्यालयाचे मालक आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आज,शुक्रवारी बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील भाजप कार्यलयाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते. केंद्रीय आरोग्य, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले, आमदार वसंत खंडेलवाल, बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, सचिन देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, पक्ष कार्यालयाचे भूमिपूजन हा सर्व कार्यकर्त्यांसाठीच आनंदाचा क्षण असतो. कार्यालय हे ‘पक्षाचे घर’ असते. याच दृष्टीने महाराष्ट्र प्रदेश भाजपने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षाचे हे ‘हक्काचे घर’ निर्माण करण्याचा निर्धार केला आहे.येत्या काळात महाराष्ट्रातील एकही जिल्हा असा असणार नाही जेथे भाजप कार्यकर्त्यांचे हे हक्काचे कार्यालय असणार नाही. या भाजप कार्यालयाच्या माध्यमातून आपण जनसामान्याला आपलेसे वाटणारे वातावरण तयार करतो की नाही, यावरून कार्यालयाची सार्थकता ठरणार आहे.
टीका टाळली
एरवी विरोधकांवर तुटून पडणारे,आक्रमक टीका करणारे फडणवीस यांचे आजचे भाषण सौम्य, मवाळ होते. त्यांनी मार्गदर्शकच्या भूमिकेतच मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना प्रोत्साहित करण्यावर त्यांनी भर दिल्याचे जाणवले.
लोकाभिमुखता कायम जपा
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे. यादृष्टीने सिंचनाच्या सोयी उभारणे, रस्त्यांचे आणि उद्योगांचे जाळे विणणे, येणाऱ्या पिढ्यांच्या हाताला काम देण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपले सरकार वेगाने काम करत आहे. आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद असाच पाठीशी ठेवत लोकाभिमुखता कायम जपण्याचे आवाहनही फडणवीस यांनी उपस्थित आमदार, पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले.