बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांत वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नियमित अंतराने होणाऱ्या या अपघातात अनेकांचे बळी जात असून निष्पाप प्रवासी जायबंदी होत आहे.विविध प्रकारच्या वाहन संख्येत झालेली वाढ, अपुरे अरुंद रस्ते, वाहतुकीच्या शिस्तीकडे होणारे दुर्लक्ष, मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे ‘फॅड’ आदि कारणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
खोल दरीत कोसळले, मोबाईल रेंजही नव्हती
बुलढाणा खामगाव राज्य मार्गावरील बोथा घाटात एका भीषण अन अभूतपूर्व अपघाताची नोंद झाली आहे. एका दुचाकीवरून जाणारे दोन युवक दुचाकीसह खोल दरीत कोसळले. घनदाट जंगलामुळे हा परिसर वरून सहज दिसणारा नाही. यातच दुर्दैवाचा कळस म्हणजे या परिसरात ‘मोबाईल रेंज’च नाही! यामुळे दरीत कोसळल्यावर तीन दिवसापासून दोघांचे मृतदेह पडून होते.
दुर्गंधी मुळे झाला उलगडा
अखेर मृतदेह कुजल्यावर दुर्गंधी सुटल्याने ‘काहीतरी भीषण झाल्याचे’ उघडकीस आले. गावाकऱ्यांनी बोथा घाटात दुर्गंधी येत असल्याची माहिती हिवरखेड पोलिसांना दिली. प्रारंभी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी ( खामगाव ) प्रदीप पाटील यांच्यासह हिवरखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार आशिष केचरे, बीट जमादार गजानन अहेर, पोलीस हवालदार महेंद्र नारखेडे व प्रदीप वानखडे हे घटनास्थळी पोहचले . यावेळी त्यांनी दुर्गंधी येत असलेल्या परिसराची पाहणी केली असता बोथा घाटातील दरीमध्ये दोन जणांचे मृतदेह पडले असल्याचे दिसुन आले. मृतदेहांच्या बाजूला दुचाकी (क्र. एमएच २७ बीपी- ५६२०) ही पडलेली होती. प रात्रीच्या अंधारामुळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आज सकाळी पोलिस मृतदेह दरीत्ूान बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहचले . यावेळी बोथा गावातील काही ग्रामस्थही घटनास्थळी दाखल झाले होते.
मृताची ओळख पटली
ग्रामस्थांकडुन या दोघांची ओळख पटली आहे. जयराम उर्फ सचिन सुरेश कांडेलकर (वय ३०, रा. बोथा फॉरेस्ट, जिल्हा बुलढाणा ) व मुन्ना दादू जामुनकर (वय ४५, रा. चिखलदरा जि. अमरावती) अशी मृतांची नावे असल्याचे निष्पन्न झाले . हे दोघे तीन दिवसांपुर्वी बुलढाणा येथे गेले होते . तेथून परत येत असतांना दुचाकी दरीत कोसळुन अपघात झाला असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचे मृतदेह कुजलेले असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.
एसडिपीओ म्हणतात अपघातच
दरम्यान यासंदर्भात एसडीपीओ प्रदीप पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी ही घटना अपघातच असल्याचे ठामपणे सांगितले. बोथा घाटातील एका वळणावर अंदाज न आल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यात दोघांचा मृत्यू झाला, असे पाटील यांनी स्पष्ट केले. दरीत मोबाईल रेंज नसल्याचे देखील ते म्हणाले.
