बुलढाणा : खामगाव नजीक राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णा फाटा नजीकच्या उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक होऊन कारमधील दोघांचा मृत्यू झाला. यामुळे घटनास्थळीचे हृदयकारक दृश्य पाहून उपस्थितामध्ये हळहळ व्यक्त झाली. मात्र वाहनाच्या तपासणी नंतर पोलीस थक्क झाले. याचे कारण अपघात ग्रस्त कारमध्ये वाहनातून चक्क गांजाचा साठा आढळून आला. यामुळे या अपघाताला वेगळेच वळण मिळाले असून एकाच घटने संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मृत हिंगोली,परभणी जिल्ह्यातील
काल रा उशिरा रात्री खामगावजवळील राष्ट्रीय महामार्गावरील टेंभुर्णा फाटा नजीकच्या उड्डाणपुलावर ही भीषण दुर्घटना घडली. जीजे ०६ बीवाय १८०४ क्रमांकाचा कंटेनर नागपूरच्या दिशेने जात होता. त्याचवेळी समोरून येणारी (एमएच ३० एफ ८३८५ क्रमांकाची) कार आणि कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील दोघेही गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले. कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये कारचालक सतीश सखाराम जाधव (वय ५३, रा. माडाखोळी, जि. परभणी) आणि सय्यद फिरोज सय्यद महबूब (वय ४६, रा. हिंगोली) यांचा समावेश आहे.
कारमधून उग्र दर्प अन पोलीस झाले थक्क!
दरम्यान अपघातानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कारची पाहणी सुरू केली. यावेळी अपघातग्रस्त कारमधून उग्र वास येत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर कारची झडती घेण्यात आली. कारच्या मागील सीटवर एका पिवळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या आणि खाकी रंगाच्या टेपने बंद केलेल्या २१ पुड्या आढळून आल्या. या पुड्यांमध्ये गांजासदृश पदार्थ असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
या पदार्थाचे वजन केले असता तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम वजन भरले. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कारमधून वाहून नेला जात असल्याचे समोर आल्याने अपघाताच्या तपासाला गंभीर वळण मिळाले. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. अपघातग्रस्त कारची किंमत पाच लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले असून, गांजा आणि कार असा एकूण सुमारे १८ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
तपासाचे आव्हान
या अपघातात कार मधील दोघांचा मृत्यू झाला.यामुळे गांजा तस्करीचा उलगडा लावण्याचे आव्हान खामगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तब्बल २६ किलो ६७० ग्रॅम गांजा घेऊन ही कार नेमकी कुठून निघाली होती? यामागील सूत्रधार कोण ? गांजा पोहोचवण्याचे ठिकाण कोणते होते? यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले
दोन गुन्हे दाखल
या प्रकरणी कंटेनरचालक साबिरअली इंतजारअली (वय २४, रा. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांच्या तक्रारीवरून मृत कारचालक सतीश जाधव यांच्याविरुद्ध अपघातासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारमध्ये गांजासदृश पदार्थ आढळून आल्याने एनडीपीएस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघाताच्या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार कैलास सावंत करीत असून, एनडीपीएस प्रकरणाचा तपास परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक सागर कदम करीत आहेत.
