बुलढाणा : यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात पावसाचे उशीरा आगमन झाले. २९ जुलै पर्यंत जिल्ह्यातील पाऊस असमाधानकारक म्हणावा असाच होता. मात्र ३० जुलै रोजी दिवसारिमझिम स्वरूपाच्या संततधार पावसाची आणि रात्रभर मूसळधार पावसाची नोंद झाली. यामुळे पावसाचे स्वरूपच बदलले. आज सकाळी संपलेल्या गत २४ तासात जिल्ह्यातील सर्वच तेरा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जळगाव जामोद तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद झाली. यामुळे पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे हाहाकार उडाला.
दोघे पुरात वाहून गेले
यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हजारो हेक्टरवरील सोयाबीन, कपाशी, मका, तूर, उडीद, मका आदि पिके पाण्याखाली गेली. शेत शिवारात पाण्याचे तलाव निर्माण झाले. दुसरीकडे निसर्गाच्या या प्रलयात मृत्यूचे तांडव पाहावयास मिळाले. काही तासातच १७५ मिलिमिटर पावसाची नोंद झालेल्या नांदुरा तालुक्यात एक इसम नदीला आलेल्या पुराच्या वाहून गेला. फुलोकाराम जानकीराम काळे( राहणार इसापूर तालुका नांदुरा) असे या व्यक्तीचे नाव आहे. ते पुराच्या पाण्यात वाहून गेले असून स्थानिक पथकामार्फत शोधकार्य चालू आहे जळगांव जामोद येथील सिध्दार्थ नगर मधील रहिवाशी महादेव जगदेव वाघोदे, वय अंदाजे ५५ वर्ष हे शौचास गेले होते. नदीला अचानक आलेल्या पूरामध्ये वाहून गेल्यामुळे मृत पावले. सदर व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.
मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शेगाव शहरातील फुलेनगर येथे घडली. मृत महिलेचे नाव सरस्वती गोटीराम पल्हाडे (वय ८५) असे आहे. अचानक भिंत कोसळल्याने सरस्वती पल्हाडे यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या. परिसरातील नागरिकांनी ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मुक्या जनावरांचे बळी
दरम्यान निसर्गाच्या तांडवात पशु धनाची हानी झाली आहे. मोताळा तालुक्यातील तळणी येथे वीज कोसळून ७ जनावरे दगावली. जळगाव येथे पुरात वाहून १६ जनावरांचा करुण अंत झाला.
