बुलढाणा : जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे जिल्हा दंडाधिकारी कार्यालय. या कार्यालयाचा इंग्रजी राजवटी पासून असलेला धाक, वचक आणि आदरयुक्त दरारा अजूनही कायम आहे. अश्या या जिल्हा कचेरी परिसरात दिवसाढवळ्या दोन धिप्पाड ‘भाई’ आपसात लढल्याची घटना नुकतीच घडली.
लढले दमले अन…
परिसरातून जाणाऱ्या चिखली राज्य मार्गावर कोणाची तमा न बाळगता हे दोघे ताकदीने एकमेकांवर तुटून पडले. त्यांना ना परिसरात तैनात खाकी चा धाक ना घटनास्थळी असलेल्या सर्वसामान्यांची तमा अशी ही तुंबळ लढाई अनेक मिनिटे रंगली. मात्र दोन्ही ताकदीने तुल्यबळ असल्याने कोणीच मागे हटायला तयार नाही. त्यांच्यातील ही झुंज अनेक मिनिटे रंगली, मात्र मध्ये पडण्याची कुणाचीच हिम्मत झाली नाही. अखेर जखमी झाल्यावर आणि दमल्यावर दोघे ‘दादा’ वेग वेगळ्या दिशेने रवाना झाले. यानंतरच शेकडो नागरिक, लघु व्यापारी आणि वाहन धारक यांनी सुटकेचा श्वास सोडला
वाहन, साहित्याची नासाधूस
आता हे दोन भाई म्हणजे गुंड मवाली नव्हते तर ते होते मस्तवाल मोकाट सांड!शहरातील गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज दुपारी मोकाट जनावरांच्या थराराने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दोन मोकाट जनावरांमध्ये झालेल्या जोरदार फ्रिस्टाईल भांडणामुळे परिसरात काही काळ भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. भर रस्त्यावर सुसाट वाहनाची तमा न बाळगता हे दोघे एकमेकांना भिडले, कुणीच मागे हटायला आणि त्यांच्या मध्ये पडायला कुणी तयार नाही असे थरारक दृश्य. लढता लढता हे दोघे स्टेट बँक समोरील छोट्या चौपाटीत घुसले.त्याठिकाणी असलेल्या पाणीपुरी आणि भेळच्या गाड्यांना या जनावरांनी जोरदार धडक दिली. रस्त्याच्या कडेला उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी वाहनांना धडक लागल्याने काही गाड्या खाली कोसळल्या आणि त्यांचे नुकसान झाले. एका गरीब झाडू विक्रेत्यालाही याचा फटका बसला. विक्रीसाठी ठेवलेले झाडू रस्त्यावर अस्ताव्यस्त विखुरले गेले, ज्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान झाले.
वाहन चालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ
हा संघर्ष तीव्र होता आणि दोघे वृषभराज बेभान झाले होते. यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या पादचाऱ्यांनी आणि वाहनधारकांनी स्वतःला कसेबसे वाचविले. अनेकांनी सैरावैरा पळायला सुरुवात केली. हा थरार पाहण्यासाठी स्टेट बँक चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.मात्र कुणीच शेवट पर्यंत मध्ये पडले नाही. अखेर घायाळ झाल्याने व दमल्यामुळे दोघांनी ही लढाई थांबविली.
मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि मुख्य बँकांचा परिसर असल्याने या भागात नेहमीच नागरिकांची आणि अधिकाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा गजबजलेल्या भागात मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या मोकाट जनावरांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.
