बुलढाणा : देऊळगाव राजा शहराला तीन वर्षांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल आज शनिवारी लागला. घरगुती वादातून आपल्या २५ वर्षीय पत्नीचा साडीने गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या पतीला बुलढाणा न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. बुलडाणा येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी आज हा ऐतिहासिक व गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल दिला.
न्यायालयाने आरोपी पतीस जन्मठेपेची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिने कारावास भोगावा लागेल. तसेच कलम ३२३ अंतर्गत ६ महिने सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनील भास्कर गिते (वय ३५ वर्ष, रा. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा ) असे जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आलेल्या झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेत शिवकन्या सुनील गिते (वय २५ वर्ष) या विवाहितेचा मृत्यू झाला होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी
घटनेच्या ६ महिने आधी मयत शिवकन्या ही पती, सासू आणि सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आपला ८ वर्षांचा मुलगा प्रतीक याच्यासह माहेरी राहत होती. तिने यापूर्वी पोलिसांत त्रासाबाबत तक्रारीही केल्या होत्या. मात्र, घटनेच्या १५ दिवस आधी मध्यस्थांमार्फत त्यांच्यात तडजोड झाली आणि शिवकन्या मुलासह सासरी नांदायला आली. मात्र नांदायला आल्याच्या अवघ्या ४ ते ५ दिवसांतच, म्हणजेच ३ एप्रिल २०२३ रोजी राहत्या घरी पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी आरोपी सुनील गिते याने शिवकन्याचा साडीने गळा आवळून खून केला.
घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या कल्पना बोधने यांनी शिवकन्याला बेशुद्ध अवस्थेत पाहून कृत्रिम श्वास देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेजारी राहुल कायंदे यांच्या गाडीने तिला देऊळगाव राजा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. प्रारंभी या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
गळ्यावर जखमांच्या खुणा
मात्र, पोलीस उपनिरीक्षक किरण खाडे यांनी केलेल्या ‘इनक्वेस्ट’ पंचनामा, साक्षीदारांचे जबाब आणि शवविच्छेदन अहवालावरून शिवकन्याचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या गळ्यावर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे ६ एप्रिल २०२३ रोजी आरोपी सुनील गितेविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला. तपासादरम्यान सासरच्या त्रासाचा मुद्धा समोर आल्याने यात भादंवि कलम ४९८-अ, ३२३, ५०४, ५०६ सह ३४ ची वाढ करण्यात आली व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले.
खटला बुलढाणा न्यायालयात वर्ग
हा खटला बुलडाणा सत्र न्यायालयात चालवण्यात आला. सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयत शिवकन्या व आरोपीचा ८ वर्षांचा मुलगा व प्रत्यक्षदर्शी प्रतीक गिते याची साक्ष महत्वाची ठरली. त्याच्यासह शेजारी कल्पना बोधने, राहुल कायंदे, मृतकचे वडील अशोक सोनुने, भाऊ पवन सोनुने, मध्यस्थ उद्भव घुगे, पंच साक्षीदार योगिता सोनुने, पंढरीनाथ नागरे, अजितसिंग बावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा अवचार, डॉ. शाहीन आसमा आणि तपास अधिकारी हेमंत शिंदे, जीवन सोनोवणे व किरण खाडे यांच्या साक्षी एकमेकांशी सुसंगत व महत्त्वाच्या ठरल्या.
आत्महत्या केल्याचा दावा
बचाव पक्षाने शिवकन्याने आत्महत्या केल्याचा दावा केला. मात्र सरकारी पक्षाने हा गळा आवळून केलेला खून असल्याचे सिद्ध केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जगमलानी यांनी आरोपी सुनील गिते याला दोषी ठरवून जन्मठेपेची ऐतिहासिक शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या एकूण रकमेपैकी ८ हजार रुपयांची रक्कम बालसाक्षीदार प्रतीक याला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. दरम्यानच्या काळात, आरोपी सासरे भास्कर गिते यांचा मृत्यू झाला, तर आरोपी सासू चंद्रभागा गिते यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी भक्कमपणे बाजू मांडली. देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील साळवे यांनी सहकार्य केले.
