बुलढाणा : वैष्णव पंथात वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत तुकोबारायांच्या भाषेत सांगायचे तर, ‘हेचि व्हावी माझी आस, पंढरीचा वारकरी, वारी चुको ना दे हरी,’ अशी उत्कट भावना वारकऱ्यांची असते. संगणक युगात पारंपरिक वारीचे स्वरूप बदलले असले तरी विठुरायाच्या भेटीची आस आणि वारीचा ध्यास कायम आहे. आटपाट बुलढाणा नगरीतून आज, बुधवारी आषाढीनिमित्त निघालेली ‘सायकल वारी’ याचे एक अनोखे उदाहरण ठरावे. बुलढाणा सायकल क्लबच्या पुढाकाराने निघालेल्या या आगळ्यावेगळ्या सायकल वारीत १०० वारकरी सहभागी झाले असून यात तरुणींचादेखील सहभाग आहे. बुलढाणा अर्बनचे या वारीला सहकार्य लाभले आहे.

राज्यातील हजारो सायकलपटूंची मंदियाळी

ही अनोखी वारी हजारो बुलढाणेकरासाठी कुतूहल आणि कौतुकाचा विषय ठरली. लक्षवेधी ठरलेल्या या वारीला आज शेकडो बुलढाणेकरांनी निरोप दिला. ‘फिट इंडिया, हिट इंडिया’ हा संदेश देत आणि विठुरायाच्या भेटीची आस मनात बाळगत बुलढाणा जिल्ह्यातील १०० हून अधिक सायकलपटू पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सायकल चालवण्याला प्रोत्साहन देणे आणि त्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्माण करणे हा या वारीमागचा मुख्य हेतू आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणतः दहा हजार सायकलस्वार पंढरपूरला एकत्र येणार आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सायकलपटूंचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

चार दिवसांत पोहोचणार पंढरीत

बुलढाण्यावरून सुरू झालेला हा प्रवास सुमारे ४५० किलोमीटरचा असणार आहे. बुलढाणा ते जालना, जालना, बीड, बीड बार्शी ते पंढरपूर असा सायकलवारीचा प्रवास मार्ग आहे. सर्व सायकलस्वार ११ तारखेला पंढरपुरात दाखल होणार आहेत. १२ तारखेला सकाळी तिथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रिंगण सोहळ्यात हे सायकलवीर सहभागी होतील.

बुलढाणा अर्बनचे सहाय्य

भारतातील अग्रेसर पतसंस्था असलेल्या आणि आर्थिक व्यवहारा बरोबर सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या बुलढाणा अर्बनकडून वारीला सहकार्य करण्यात आले आहे. संस्थेकडून पंढरपूर येथे सायकल स्वारांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आज या आधुनिक वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी राधेश्याम चांडक यांनी स्वतः हजेरी लावून त्यांचा उत्साह द्विगुणित केला. याशिवाय प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी जेवणाची आणि इतर सोयी-सुविधांची मदत स्थानिक लोकांकडून मिळणार आहे.