बुलढाणा : तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अती संवेदनशील गाव असलेल्या धाड येथे एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरीकडे आईसह दोन चिमुकले अत्यवस्थ असून त्यांना या तिघांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील शासकीय वैधकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तिघा माय लेकीपैकी एकीची प्रकृती गंभीर असून ती मृत्यूशी दोन हात करीत असल्याचे वृत्त आहे. या सर्वांना अन्नातून विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा विस्तृत तपशील अजून प्राप्त झाला नाही. रुग्णालय व नातेवाईकांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (वय ४ वर्षे ) व मशीरा मोहंमद जमदार (वय ७ वर्षे ) या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. आई अफरीन मोहंमद वसीम जमदार (वय ३४ वर्षे ), मुलगी फातिमा वसीम जमदार (वय ८ वर्षे ) व अश्मिरा वसीम जमदार (वय ३ वर्षे ) या तिघींवर उपचार सुरू आहेत. यातील एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमके काय झाले?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद वसीम जमदार यांच्या कुटुंबातील पत्नी व मुलांना काल रविवार, पाच एप्रिलपासून पोटदुखी, मळमळ उलट्यांचा त्रास होत होता. सोमवार, ६ एप्रिल २०२६ च्या सकाळी हा त्रास वाढतच गेल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अली व मशिरा यांचा मृत्यू झाला. आई व दोन मुली यांची प्रकृती व्यवस्थित नसल्याने त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. यापैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर शर्थीचे उपचार करण्यात येत आहे.
पंचक्रोशीत हळहळ
दरम्यान बहीण भावाचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याने धाड व पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. धाड नगरी व परिवार राहत असलेला परिसर अक्षरशः हादरला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईक व धाड वासियांची मोठी गर्दी झाली असून तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
