बुलढाणा : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे भारतासह जगात जागतिक मंदीसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आर्थिक सत्ता बनण्याची स्वप्ने पाहणारा भारत देश या धक्क्यातून बाहेर पडला नाही. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याने आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत निर्यातीत प्रथमच १,०५१ कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील या विक्रमी कामगिरीमुळे बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रातील उदयोन्मुख निर्यात केंद्र म्हणून अधिक ठळकपणे पुढे आला आहे. विशेष म्हणजे, अमरावती विभागाच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल ४७.४ टक्के वाटा एकट्या बुलढाणा जिल्ह्याचा असून, विभागात जिल्ह्याने सलग अव्वल स्थान कायम राखले आहे.

पाच वर्षांत १४६ टक्क्यांची विक्रमी वाढ

जिल्ह्याच्या निर्यातीत गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ४२८ कोटी रुपये असलेली निर्यात २०२५-२६ मध्ये १,०५१ कोटी रुपयांवर पोहोचली असून, या कालावधीत १४६ टक्क्यांची एकत्रित वाढ नोंदविण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षातील ८७४ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २०.३ टक्क्यांची वार्षिक वाढ झाली आहे. कृषी आणि औद्योगिक क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढल्याचे हे महत्त्वपूर्ण द्योतक मानले जात आहे.

अमरावती विभागात बुलढाण्याचे वर्चस्व

अमरावती विभागाची निर्यात एकूण २,२१८ कोटीची आहे. या निर्यातीपैकी सर्वाधिक १,०५१ कोटी रुपयांची निर्यात बुलढाणा जिल्ह्यातून झाली आहे. विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये अकोला ५१९ कोटी, अमरावती ३५० कोटी, यवतमाळ २५७ कोटी आणि वाशीम ४१ कोटी रुपये अशी निर्यातीची क्रमवारी आहे. या आकडेवारीवरून विभागातून निर्यात होणाऱ्या प्रत्येक दोन रुपयांपैकी जवळपास एक रुपयांचा माल बुलढाणा जिल्ह्यातून परदेशात जात असल्याचे स्पष्ट होते.

मूल्यवर्धित उत्पादनांमुळे चालना

जिल्हा आता केवळ पारंपरिक कृषी उत्पादनांपुरता मर्यादित न राहता मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्यातीवर भर देत आहे. निर्यातीत कापूस २२३ कोटी रुपयांसह अग्रस्थानी आहे. मात्र यांचबरोबर इतर क्षेत्रातील कामगिरी देखील उल्लेखनीय ठरली आहे. सुगंधी तेले व सौंदर्यप्रसाधने (२२१ कोटी रुपये), विविध रासायनिक उत्पादने (१३१ कोटी रुपये), गळित धान्य व कृषी बियाणे (१३८ कोटी रुपये) तसेच खाद्य भाज्या व कंदमुळे (११६ कोटी रुपये) या प्रक्रियायुक्त उत्पादनांनी निर्यातीला मोठी गती व उभारी दिली आहे. विशेष म्हणजे, सुगंधी तेले व सौंदर्यप्रसाधनांच्या निर्यातीत ११९ कोटी, तर रासायनिक उत्पादनांमध्ये १०२ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

बांगलादेश मोठी बाजारपेठ

बुलढाणा जिल्ह्यातील उत्पादनांसाठी बांगलादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली असून, तेथे २३१ कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. याशिवाय इंग्लंड (युनायटेड किंगडम) नेदरलँड्, सिंगापूर आणि अमेरिका यांसारख्या विकसित देशांमध्येही जिल्ह्यातील कृषी व औद्योगिक उत्पादनांची मागणी सातत्याने वाढत आहे.

‘ही तर ऐतिहासिक उपलब्धी’

या ऐतिहासिक यशामागे जिल्हा प्रशासनासोबतच जिल्हा उद्योग केंद्राचे मोलाचे योगदान राहिले आहे. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. ‘डिस्ट्रिक्ट्स एक्सपोर्ट हब’ योजनेअंतर्गत स्थानिक उद्योजकांसाठी खरेदीदार-विक्रेता मेळावे, उद्यम आणि निर्यात नोंदणी मोहीम, तसेच गुणवत्ता मानकांबाबत विशेष कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

भविष्यात सुगंधी तेले आणि रसायनांसाठी विशेष क्लस्टर्स विकसित करण्याचे आणि शीतगृह सुविधा बळकट करण्याचे प्रशासनाचे धोरण आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी समाधान व्यक्त करत, १,००० कोटी रुपयांचा निर्यातीचा टप्पा पार करणे हा संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ही कामगिरी शेतकरी, उद्योजक, निर्यातदार आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.