scorecardresearch

बुलढाणा : देऊळघाटचे ‘नवाब’ सईदउल्ला खान काळाच्या पडद्याआड !; मूळ परिवार अफगाणिस्तानातील

पूर्वजांकडून अलिगढ विद्यापीठाच्या उभारणीत हातभार

बुलढाणा : देऊळघाटचे ‘नवाब’ सईदउल्ला खान काळाच्या पडद्याआड !; मूळ परिवार अफगाणिस्तानातील
बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सईदउल्ला खान

जिल्ह्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथील नवाब परिवारातील ज्येष्ठ सदस्य तथा बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सईदउल्ला खान यांचे गुरुवारी ( दि. २२) रात्री २ वाजता निधन झाले. त्यांना ९४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले.सईदउल्ला खान हे नवाब घराण्याच्या पाचव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे समाजसेवी होते. तेथील जिल्हा परिषद विद्यालय शिक्षण समितेचे ते तब्बल ४० वर्षे अध्यक्ष राहिले. १९९२- ९७ या कालावधीत बुलढाणा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते अपक्ष निवडून आले. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या समाज बांधवांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे या गावाने ‘उर्दू शिक्षकांचे गाव’ असा लौकिक मिळविला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक यांनी नुकतीच त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारणा केली होती. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा >>> गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; बंदोबस्तासाठी आरमोरीत नागरिकांचा ठिय्या

निजामांनी सोपवली होती मोठी जबाबदारी
अफगाणिस्तान येथून हैदराबादला पोहोचलेल्या नवाब परिवाराला हैदराबादच्या निजामाने देऊळघाट परगण्याची जबाबदारी सोपविली होती. उत्तरप्रदेश येथील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या उभारणीमध्ये सर सय्यद अहेमद खान यांना या परिवाराने साथ दिली होती. याच कुटुंबातील नवाब सलामअल्लाह खान हे विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते. देऊळघाटच्या जडण-घडणीत नवाब घराण्याचे मोठे योगदान आहे. यामुळे सईदउल्ला खान यांच्या निधनाने देऊळघाट परिसरात शोककळा पसरली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ न्यूज ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Buldhana district of the council ex member syedullah khan passed away amy

ताज्या बातम्या