बुलढाणा : करोना काळात ऑनलाईन पद्धतीने अध्यापन, अध्ययन पार पडले. यामुळे शिक्षणात खंड पडला नसला तरी हजारो विद्यार्थ्यांच्या हाती नको त्या वयात मोबाईल आला. त्यामुळे कळत नकळत नवीन पिढीला मोबाईलचे व्यसन लागले.
त्याचे प्रतिकूल, गंभीर दूरगामी परिणाम आजही दिसून येतात. मोबाईलच्या जोडीला खाजगी वाहिन्या आल्याने चालू पिढीचे सर्वकष नुकसान झाले आहे. यामुळे विद्यार्थी धड अभ्यास करीत नाही अशी पालकांची तक्रार आहे.
या प्रातिनिधिक तक्रारीवर चिखली तालुक्यातील डोंगरशेवली येथील शाळा व्यवस्थापन समितीने पालक, गावकऱ्यांच्या सहकार्याने एक अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे नाव ‘अभ्यासाचा भोंगा’ असे असून याचे सकारात्मक परिणाम दिसून आले व येत आहे.
अर्थात नुसतेच घोषणा न करता ‘ अभ्यासाचा भोंगा ‘ ची काटेकोरअंमलबजावणी करण्यात आली व येत आहे. याला पालक आणि शेकडो विद्यार्थ्यांनी मनापासून प्रतिसाद दिल्याने गावात शिस्तबद्ध अभ्यासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलत्या काळात मोबाईल आणि टीव्हीच्या विळख्यात अडकलेल्या विद्यार्थी पिढीला पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळवण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, डोंगर शेवली येथे ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
काय आहे ‘भोंगा’?
गावातील मुलांच्या अभ्यासात सातत्य राहावे, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षक वृंद यांनी पालकांशी चर्चा करून ही संकल्पना मांडली. याला गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एका दानशूर माजी विद्यार्थ्याने या भोंग्यासाठी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. आता दररोज संध्याकाळी ७ वाजता गावात अभ्यासाचा भोंगा वाजतो आणि सर्व विद्यार्थी एकाच वेळी अभ्यासाला बसतात.
या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत गावातील पालक देखील स्वतःचे मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवतात. यामुळे घरात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. केवळ भोंगा वाजवून न थांबता, शाळेचे मुख्याध्यापक अनिल लोखंडे, वाघमारे, सतीश दांदडे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मुले अभ्यास करत आहेत की नाही, याची खात्री करतात.शालेय मंत्रिमंडळाच्या विद्यार्थ्यांनीही या गृहभेटींमध्ये सहभाग नोंदवला.
सुखावह चित्र
ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीसाठी पालकांनी दाखवलेली ही जागरूकता कौतुकास्पद आहे. भोंगा वाजताच संपूर्ण गावात अभ्यासाची शांतता पसरते, हे चित्र सुखावह आहे असे मत अनिल लोखंडे मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले आहे. उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र सावळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बबन सावळे, छगन सावळे, सोमनाथ संस्थान अध्यक्ष अमोल सावळे, शरद वानखेडे, छगन दांदडे, रवि जवंजाळ, मोहन सावळे, भगवान सावकार आदि उपस्थित होते.

