बुलढाणा : मराठवाड्यातील भूकंपामुळे सीमावर्ती भागातील मेहकर व लोणार तालुक्यातील व मराठवाड्याला लगतच्या काही भागात सौम्य धक्के जाणवल्याची चर्चा होत आहे. यामुळे मेहकर व लोणार तालुक्यात काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने याचा तूर्तास इन्कार केला असला तरी ग्रामीण नागरिकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भुकपांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यानुसार याबाबत अंदाज लावल्या जात आहे. यामुळे चर्चा वा अफ़वाना पेव फुटले.
मराठवाड्यात भूकंपाचे बुलढाण्यात चर्चा,भीतीचे धक्के
यासंदर्भात बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी सांगितले की मराठवाडायला लागून असलेल्या लोणार व मेहकर तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याची चर्चा आहे. मात्र मेहकर व लोणार तहसीलदार यांनी असा कोणताही अहवाल दिला नसल्याचे वा प्राथमिक माहिती नसल्याचे आज गुरुवारी सकाळी सांगितले आहे. आज सकाळी ११ वाजेपर्यंत अशी कोणतीही माहिती जिल्हा आपत्ती कक्षाकडे नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. मात्र नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन त्यानी केले.
तीन जिल्ह्यात भूकंप
काल ८ जुलैच्या मध्यरात्री नंतर १वाजून ३७मिनिट ते सव्वा तीन वाजे दरम्यान हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे चार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली होता असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पहिला धक्का १ वाजून ३७ मिनिटांनी, दुसरा धक्का २ वाजून १५ मिनिटांनी, तिसरा धक्का २ वाजून १७ मिनिटांनी तर चौथा धक्का३ वाजून २३ मिनिटांनी जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली येथे आहे.
चर्चा, अफवांचे धक्के
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यातील काही भागांत देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील एका व्हायरल व्हिडीओमुळे या चर्चाना जोर आला. व्हिडीओतील धक्क्याची तीव्रता लक्षात घेता मेहकर, लोणार मध्ये कंपन जाणवल्याच्या चर्चाना जोर आला. मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी याचा इन्कार केला.
