बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट पसरले आहे. खरीप हंगाम उध्वस्त झाला असून रब्बी हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. यामुळे रब्बी पिकांच्या पेऱ्यात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.

अडचणीचा चक्रव्युह

भीषण दुष्काळ, सततची नापिकी, वाढता कर्जबाजारीपणा, अपुरी सिंचन सुविधा आणि आर्थिक विवंचनेच्या चक्रवयुव्हात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढील संकट अधिकच गंभीर बनत चालले आहे. अस्मानी सुलतानीचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. यातून कोणताच मार्ग न उरलेले शेतकरी आत्महत्येचा अंतिम पर्याय निवडत आहे. गत दहा महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल १११ शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यातील २१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीस अपात्र ठरल्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवाराना मदत
नाकारण्यात आली आहे.

यंदा तर जिल्ह्यात भीषण दुष्काळाचे सावट आहे.नापिकी, कर्जबाजारीपणाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांसमोरील संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

२१ परिवाराला नाकारली मदत

या पार्श्वभूमीवर चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या काळात १११ शेतकरी आत्महत्येची नोंद झाली आहे. चौकशीअंती ६९ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या असून संबंधित शेतकरी कुटुंबांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. २१ प्रकरणे शासनाच्या निकषात बसत नसल्याने मदतीस अपात्र ठरली आहेत. २१ प्रकरणाची चौकशी अजूनही झाली नाही. यातील किती आत्महत्या शासकीय निकषावर पात्र वा अपात्र ठरतात हे चौकशी नंतरच स्पष्ट होणार आहे.

आत्महत्या तपशील

जानेवारी – १४
फेब्रुवारी – १२
मार्च – ११
एप्रिल – १५
मे – १५
जून – १३
जुलै – १२
ऑगस्ट – ३
सप्टेंम्बर -९
ऑक्टोबर -७
एकूण – १११.