बुलढाणा : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यात मागील तीन चार वर्षांत लाखो शेतकऱ्यांसाठी अनुकूल असे काहीच घडले नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांवर शासन प्रशासनकडून ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे हतबल होऊन जगणे किंवा आत्महत्या करणे हे दोन पर्यायच जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांसमोर शिल्लक होते व आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी आहे त्यात समाधान मानून घेण्याचा मध्यम मार्ग निवडला. काहींनी आत्महत्येद्वारे मृत्यूला कवटाळले.

मात्र या संमिश्र पार्श्वभूमीवर काही शेतकरी चुकीच्या मार्गाने, स्पष्टच सांगायचे झाल्यास गुन्हेगारीच्या मार्गाने जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. काबाडकष्ट करून आणि हाती फारसे काही लागणार नाही, या नैराश्यातून त्याच्या जोडीला गांजाचे पीक घेत गडगंज कमाई करण्याचा हा तिसरा पर्याय वा चुकीचा मार्ग होय.

चालू महिन्यात पोलिसांनी केलेल्या दोन कारवायानी ही धक्कादायक बाब उघडकीस आली. शेतकऱ्यांच्या काडीचेही नुकसान होऊ नये, यासाठी फर्मान बजावणाऱ्या राजमाता जिजाऊंचे माहेर असलेल्या सिंदखेड राजापासून नाजिकच असलेल्या मलकापूर पांग्रा येथे गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळून आले. यात साडेबारा लाखांचा गांजा जप्त करण्यात आला.

या कारवाईत सुधाकर गायकवाड (६५) या वृद्ध शेतकऱ्याला अटक करण्यात आली. गांजाची ७६ किलो व ११ लाख ४० हजार रुपयांची ओली झाडे तसेच कोरडी ५ किलो ५६० ग्रॅम आणि १ लाख ११ हजार किमतीची, असा एकूण ८१ किलो ६२० ग्रॅम वजन अंदाजे १२ लाख ५२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देऊळगाव राजातही

यापूर्वी संत चोखामेळा यांचे जन्मगाव असलेल्या मेहुणा राजा (ता. देऊळगाव राजा)मध्येही अशीच कारवाई करण्यात आली. शेतामध्ये गांजाची लागवड करून त्याची साठवणूक करणाऱ्या विष्णू बोरुडे (३९) याला अटक करण्यात आली. त्या कारवाईत ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता.

यापूर्वी देखील अशा घटना उघडकीस आल्या आहे. वरील दोन घटनातील एक शेतकरी ६५ तर एक ३९ वयाचा आहे. या वयात त्यांची पाऊले वाम मार्गाकडे वळणे कृषिप्रधान जिल्ह्यासाठी आणि सामाजिक स्वास्थासाठी धोक्याची घंटा आहे.

शेती आतबट्ट्याचा धंदा, पण…

खरीप पिकांचे ७.५० लाख हेक्टर क्षेत्राखालील लागवड क्षेत्र, त्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात देशात आघाडीवर, रब्बी पिकांचे २.३० ते ३ लाख हेक्टर लागवड क्षेत्र, साडे पाच लाखाच्या आसपास असलेले पशुधन, दर्जेदार उत्पादन असलेल्या फळबागा, असे जिल्ह्याचे कृषी वैभव. जिल्ह्याची ६० टक्के अर्थ व्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून. मात्र सिंचनाची अपुरी व्यवस्था, अपुरी वीज सुविधा, महागडी बी- बियाणे, खते, वाढत चाललेली मजुरी, यांत्रिकी शेतीचा वाढता वापर, या बाबी प्रतिकूल ठरत आहे.

निसर्गाचा मनमानीपणा, कधी ओला, तर कधी कोरडा दुष्काळ, उत्पादनाला हमी भावापेक्षा मिळणारा कमी भाव, लागवड खर्च नही भरून न निघणे, केंद्राची आयात-निर्यातसारखी घातक धोरणे, यांमुळे शेती हा आतबट्ट्याचा धंदा ठरला आहे. यामुळे शेतकरी कैक वर्षांपासून सर्वार्थाने ‘कोमात’ गेला आहे. परिणामी आत्मघाताचा मार्ग स्वीकारणे हा पर्याय होता. मात्र, आता हाच शेतकरी वाममार्गाला लागला असून ही धोक्याची घंटा आहे. हा घातक पर्याय, मोह, कृषी क्षेत्राची प्रतिकूल परिस्थिती, की शासनाची शेतकऱ्यांप्रतीची उदासीनता, असा यक्षप्रश्न आहे. जुजबी नुकसानभरपाई, किसान सन्मान, हमी भावाच्या फसव्या घोषणा याचे कायम स्वरूपी उत्तर नाही.