बुलढाणा : घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर चा काळा बाजार सामान्य बाब ठरली आहे. या गोरख धंद्यात गुंतलेले अवैध व्यावसायिक काय व कसे डोके लढवतील याचा नेमच नाही. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या दक्षता पथकाने दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यात धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.  बुधवारी मध्यरात्री नंतर ही कारवाई करण्यात आली.

मुंबई – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या कारवाईत खामगाव तालुक्यात सुदर्शन ढाब्याजवळ इंडेन गॅस कंपनीतून भरून टँकर आणण्यात आला. या टँकरमधील गॅस घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मध्ये नोझल व अन्य उपकरणाच्या मदतीने अवैधरित्या रिकामा केला जात होता.

राज्य दक्षता पथकाचे वरिष्ठ अधिकारी चंद्रकांत डांगे यांना या अवैध धंद्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी अधीनस्थ अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यावरून मुंबई येथील पथकने खामगाव शिवारातील सुदर्शन धाब्याजवळ धाड घातली.गॅसची अवैध भरणा करणाऱ्या एकास टँकर मधील गॅस सिलिंडर मध्ये भरताना रंगेहात पकडले .

बुलढाणा पुरवठा विभागाचे म्हणणे काय?

दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या घरगुती व व्यावसायिक गॅसच्या काळाबाजार करणाऱ्यांवर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता चमुने ने मोठी कारवाई केली. कारवाईने या गोरख धंद्यात गुंतलेल्या व्यावसयिकामध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे तब्बल ५०० किलोमीटर अंतरावरुन येऊन बुलढाणा नागरी पुरवठा विभागाच्या नाकावर टिच्चून मुंबईच्या टीमने ही मोठी कारवाई केली . या कारवाईमुळे बुलढाणा पुरवठा विभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

चालकास अटक

दोन भलेमोठे गॅस टँकर, ११गॅस सिलेंडर आणि टँकर मधील गॅस सिलिंडर मध्ये भरण्यासाठी लागणारे साहित्य असा तब्बल ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य निरीक्षण अधिकारी मुंबई नागनाथ हंगारगे, अन्न व पुरवठा विभाग मुंबईचे प्रदीप काळे यांनी ही माहिती दिली.