बुलढाणा : ‘हिप जॉइंट’ला झालेले गुंतागुंतीचे फॅक्चर, पोटातील मोठ्या गाठीमुळे आतड्यांवर निर्माण झालेला दाब, पचन व दैनंदिन शारीरिक हालचालीवर झालेला गंभीर परिणाम, यांमुळे महिलेला कमालीचा अशक्तपणा आला होता. महिलेची प्रकृती चांगलीच खालावली होती. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते.

‘जिजाऊ’च्या लेकरांनी पेलले आव्हान

मात्र स्थानिक राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची आणि अतिधोकादायक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत एका महिलेला नवजीवन दिले. दोन तास चाललेल्या शस्त्रक्रियेत महिलेच्या पोटातील तब्बल १५.५ किलोग्रॅम वजनाची अंडाशयातील (ओव्हेरियन) गाठ, तसेच गर्भाशय आणि ‘ओमेंटम’ (पोटातील चरबीचा थर) यशस्वीपणे काढण्यात आला. सध्या रुग्ण महिलेची प्रकृती स्थिर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तिच्यावर २४ तास देखरेखेखाली उपचार करण्यात येत आहे.

काही महिन्यापूर्वी कार्यान्वित झालेल्या आणि सध्या ‘आकारास’ येत असलेल्या राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी ही अत्यंत जोखमीची कामगिरी यशस्वीपणे बजावली आहे. याबद्दल डॉक्टरांच्या चमुचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

अनेक आजारानी ग्रस्त होती महिला रुग्ण

रुग्ण महिला काही काळापासून गंभीर आजारांनी त्रस्त होती. हिप जॉइंटला झालेल्या गुंतागुंतीच्या फॅक्चरमुळे ती पूर्णपणे अंथरुणाला खिळली होती. त्यातच पोटातील प्रचंड आकाराच्या गाठीमुळे आतड्यांवर मोठा दाब निर्माण झाला होता. त्यामुळे तिला अन्न घेणे, पचन होणे आणि दैनंदिन हालचाली करणेही अशक्य झाले होते. सततच्या अशक्तपणामुळे तिची प्रकृती अत्यंत खालावली होती. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांसाठी मोठे आव्हान होते. भूल देण्यापासून ते शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्पा अत्यंत जोखमीचा होता. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरली.

चमुने कौशल्य लावले पणाला

सलग दोन तासांच्या प्रयत्नांनंतर १५.५ किलो वजनाची गाठ, गर्भाशय आणि ‘ओमेंटम’ सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सक डॉ. निखिल नलावडे, डॉ. गौरव गायकवाड, डॉ. किशोर वानखेडे आणि डॉ. शुभम पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.भूलतज्ज्ञ डॉ. सुवर्णा काटकर यांनी भूल व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून तिची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याची माहिती डॉ. निखील नलावडे यांनी दिली.

बुलढाण्याची रुग्णालयाची उपलब्धी

बुलढाण्यासारख्या जिल्हा मुख्यालयावरील शासकीय रुग्णालयात एवढी दुर्मिळ आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांच्या पथकाचे आणि रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले असून या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बुलढाणा्यासारख्या लहान शहरात देखील अशी गुंतागुंतीची शश्त्रक्रिया यशस्वी होणे ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.