बुलढाणा : २९ जुलै अखेर असमाधानकारक पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा जिल्ह्यात गत २४ तासात मुसळधार पावसाची नोंद झाली. काल गुरुवारी रात्रभर जिल्ह्यात जणू काही आभाळ कोसळल्या सारखा पाऊस झाला! जिल्ह्यातील तेराही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अनेक महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. यामुळे नदी नाल्याना पूर आले असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेली असून शेत शिवाराना तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शेगावात घराची भिंत अंगावर कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
काही तासातच जिल्हा जलमय
काल गुरुवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती. रात्री उशिरा दमदार पावसाला सुरुवात झाली. काही तासातच आभाळ फाटल्यासारख्या पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जळगाव तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २०७ मिलिमिटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. त्या खालोखाल नांदुरा तालुक्यात १७५ पावसाने हजेरी लावली.
बुलढाणा १०५ मिमी , चिखली ११०, देऊळगाव राजा ८३ सिंदखेड राजा ९८, लोणार १०० मेहकर १११, खामगाव १५२ मिमी, शेगाव १४०, मलकापूर १३१, मोताळा १०७, संग्रामपूर ११८ अशी इतर तालुक्यातील पावसाची आकडेवारी आहे.
विक्रमी पाऊस!
दरम्यान आज सकाळी साडे आठ वाजेपर्यंत संपलेल्या गत २४ तासात जिल्ह्यात सरासरी १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच मुदतीत जिल्ह्यात एकूण ३८६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरी ७६१.६ च्या तुलनेत ३८६ मिमी पाऊस झाला असून याची टक्केवारी ५०. ६४ इतकी आहे. जिल्ह्यातील ९२ पैकी ९१ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जळगाव तालुक्यातील जळगाव मंडळात तब्बल २५५ मिमी असा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
भिंत कोसळून वृद्धेचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शेगाव शहरातील फुलेनगर येथे घडली. मृत महिलेचे नाव सरस्वती गोटीराम पल्हाडे (वय ८५) असे आहे. सततच्या पावसामुळे संबंधित घराची भिंत कमकुवत झाली होती. रात्री अचानक भिंत कोसळल्याने घराजवळ असलेल्या सरस्वती पल्हाडे यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरु केले. ढिगाऱ्याखालून त्यांना बाहेर काढण्यात आले; मात्र गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
