बुलढाणा : जळगाव जामोदच्या बहुचर्चित हत्या प्रकरणाला धक्कादायक आणि नाट्यमय वळण लागले. कथितरित्या मृत झालेली युवती जिवंत असल्याचे निष्पन्न झाले आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकासह जिल्हा पोलीस दल अक्षरशः हादरले. बुलढाणा पोलिसांनी याप्रकरणात निष्काळजीपणाचा कळसच गाठला. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा डागाळली. त्याचे पडसाद आता उमटायला लागले आहे.

बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीसह पाच कर्मचाऱ्यांची आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांची उचलबांगडी केली आहे. या सहा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. यातील बहुतेक कर्मचारी आज शनिवारी दुपारी नियंत्रण कक्षात रुजू झालेत.

खळबळजनक अन् धक्कादायक घटनाक्रम

राजुरा शिवारात मागील २६ एप्रिल २०२६ रोजी शिर नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाणे हद्दीतील शिवानी कलमेकर ही महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर राजुरा येथे सापडलेला मृतदेह शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी तिचे वडील आणि भाऊ यांना खून प्रकरणात अटक केली होती.

नाट्यमय वळण अन् …

मात्र, २८ मे रोजी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. मृत समजली गेलेली शिवानी कलमेकर स्वतः मध्य प्रदेशातील खकनार पोलीस ठाण्यात हजर झाली. ‘मी जिवंत असून माझ्या खुनाच्या प्रकरणात माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्यांची तातडीने सुटका करावी,’ अशी मागणी शिवानीने पोलिसांकडे केली. यामुळे अधिकारी, कर्मचारीच नव्हे अख्खे पोलीस दल हादरले! पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तपासातील हलगर्जीपणा आणि निष्कर्ष काढण्यात झालेल्या घाईबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.

पोलीस अधीक्षकांचे ‘डॅमेज कंट्रोल’

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी ‘डॅमेज कंट्रोल’अंतर्गत तडकाफडकी कार्यवाहीचा बडगा उगारला. कर्तव्यात निष्काळजीपणा व कसूर केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि आदिल रहमान परसुवाले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.

कारवाईची टांगती तलवार कायम

दुसरीकडे, या प्रकरणात आढळून आलेला मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच तपासात झालेल्या त्रुटींबाबत पुढे कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणी आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असे बोलले जात आहे.