बुलढाणा: आदिवासी बांधवासाठी होळीचा सण उत्सव मानला जातो. हा सण तोंडावर आला असताना बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल जळगाव जामोद तालुक्यात दोन आदिवासी समुदायात मोठा संघर्ष उडाला. मुलीला पळवून आणण्याच्या कारणावरून जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर येथे शनिवारी रात्री हा राडा झाला. यात मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी उमापूर येथे दाखल होत मुलाच्या घरातील साहित्याची तोडफोड केली. यामुळे दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलिसांनी उमापूर गावात धाव घेतली. परिस्थिती चिघळल्याने इतर ठिकाणाहून पोलीस कुमक मागविण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पळवून आणलेली मुलगी ही जळगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील हेलापाणी येथील आहे. मुलगा हा जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल व दुर्गम भागातील उमापूर येथील रहिवासी आहे. मुलगी जातीने भिलाला असून मुलगा हा कोरकू जमातीचा आहे. त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. यामुळे दोन गटात कडाक्याचा वाद झाला. याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

मुलीच्या संतप्त नातेवाईकांनी तुफान दगडफेक करीत मुलाच्या घराची व आतील संसार उपयोगी साहित्य, उपकरणांची तोडफोड करण्यात आली. मुलाच्या घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच इतर सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून मोठे नुकसान करण्यात आले आहे.

अखेर ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेता काही तासाच्या आत मुलगी तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिली. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली. मात्र आज रविवारी देखील उमापूर गावात तणावपूर्ण शांतता आहे. घटनेला हिंसक वळण लागू नये म्हणून खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील , विशेष राखीव पोलीस दल, दंगा काबू पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

दरम्यान उमापूर येथे आज रविवारी एक मार्च रोजी स्थानिक आठवडी बाजार आहे. त्याचसोबत आदिवासी समाजाचा मोठा भोंगऱ्या होळी उत्सव आहे. मात्र या संघर्षमुळे उत्सवावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या गावात जागोजागी चौख पोलीस बंदोबस्त आहे. त्यामुळे उमापूर गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.