बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहर म्हणजे जिल्ह्याची औद्योगिक व व्यावसायिक राजधानी आहे. खामगावातील उद्योगाची ख्याती आणि व्याप्ती दूरपर्यंत पोहोचली आहे. या व्यवसाय नगरी खामगाव येथील एका अडत व्यापाऱ्याला ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकवून प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. त्याला नंतर धमकावून ‘ब्लॅकमेल’ करणाऱ्या एका टोळीचा अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे खामगाव शहरासह व्यापार वर्तुळ हादरले आहे.

काय आहे प्रकार?

हा खळबळजनक घटनाक्रम खामगाव ते अकोला जिल्ह्यात घडला असून तो नुकताच उघडकीस आला आहे.अकोला येथील सिव्हिल लाईन पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या कारवाईत पती, पत्नी आणि एका ६६ वर्षीय वृद्ध महिलेला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. खामगावच्या व्यापाऱ्याकडून तिघा आरोपींनी लुटलेली रोकड आणि सोन्याची अंगठी जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खामगाव दालफैल येथील सुशील पांडुरंग खेडकर या तक्रारदार व्यापाऱ्याला एका महिलेने फोन करून अकोला शहरात बोलावून घेतले. व्यापारी आपल्या कारने ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ती महिला त्यांच्या कारमध्ये बसली आणि त्यांना घुसर गावाच्या दिशेने घेऊन गेली. एका हॉटेलजवळ कार थांबवून दोघेही खाली उतरले. दरम्यान याच वेळी परिसरात असलेला एक पुरुष आणि एक वृद्ध महिला दुचाकीने तिथे पोहोचले.

अडीच लाखांची मागणी

यावेळी घटनास्थळी आलेल्या पुरुषाने ​बदनामीची भीती दाखवून अडीच लाखांची मागणी केली. व्यापाऱ्याशी वाद घालू लागला की तो त्याच्या पत्नीसोबत तिथे काय करत आहे असा सवाल करीत त्याने भयभीत झालेल्या व्यापाऱ्यासोबत वाद घातला. सोबत असलेल्या वृद्ध महिलेनेही स्वतःला त्या तरुणीची सासू असल्याचे सांगत व्यापाऱ्याला धमकावले. त्यानंतर या तिघांनी व्यापाऱ्याला जवळच्या शेतात नेले आणि तिथे त्याचे कपडे काढून ‘त्या’ महिलेसोबत फोटो आणि व्हिडिओ काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांनी व्यापाऱ्याकडे अडीच लाख रुपयांची मागणी केली. ​बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने तात्काळ पैसे देण्याचे मान्य केले. त्यांनी आपल्या मुलाला फोन करून १० हजार रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. आरोपींनी व्यापाऱ्याकडून एकूण ५५ हजार रुपये आणि त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी बळजबरीने हिसकावून घेतली. उर्वरित रक्कम नंतर पाठवण्याच्या अटीवर आरोपी तिथून पसार झाले.

तिघे जेरबंद

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यापाऱ्याने अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्र फिरवून नितेश प्रभाकर थोप, त्याची पत्नी (दोन्ही रा.हणार खरब डोरे, तालुका मूर्तिजापूर) आणि संजय नगर येथील ६६ वर्षीय महिलेला अटक केली. या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिव्हिल लाईन पोलीस पुढील तपास करत आहेत. ​ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. रेड्डी आणि उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार मानसी काचोटे व त्यांच्या पथकाने केली आहे. या घटनेच्या पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी पुढे येण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच या तिघांनी आणखी काही जणांना असेच फसविले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.