बुलढाणा : किरकोळ वादातून अमानुषतेची मर्यादा ओलांडणारी संतापजनक व तितकीच धक्कादायक घटना लोणार तालुक्यातील उदनापूर येथे उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादात मध्यस्थी करण्यास नकार दिल्याच्या संतापातून एका ६० वर्षीय मागासवर्गीय वृद्ध महिलेला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. राजमाता जिजाउंचे माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुका हादरला आहे.

या प्रकरणी लोणार पोलिसांनी आरोपी रमेश अर्जुन मुळे याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडितन भिकाबाई लक्ष्मण नेमाडे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. येथे प्राप्त माहितीनुसार आरोपी रमेश मुळे व त्याचा पुतण्या संजय मुळे यांच्यात काही दिवसांपासून संपत्तीच्या कारणावरून वाद सुरु होता. या प्रकरणात समझोता घडवून आणण्यासाठी मध्यस्थी करावी, असा दबाव आरोपीकडून टाकण्यात येत होता. मात्र दोन्ही पक्षांत समझोता न झाल्याने आरोपीने हा राग मनात धरल्याची चर्चा आहे..

खाली पाडल्यावर लाथाबुक्क्यानी मारहाण

घटनेच्या दिवशी, काल संध्याकाळी सायंकाळी उशिरा भिकाबाई नेमाडे या गावातील पिठाच्या गिरणीतून दळण आणण्यासाठी गेल्या होत्या. गिरणी बंद असल्याने त्या घरी परतत होत्या. परत येत असताना आरोपी रमेश मुळे याने त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर मागून येत त्यांच्या कमरेत जोरदार लाथ मारली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे वृद्ध महिला खाली कोसळल्या.

यानंतर आरोपीने खाली पडलेल्या महिलेवर लाथाबुक्क्यांचा मारा करत बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता जातीवाचक शिवीगाळ करत अत्यंत अभ्लील व लज्जास्पद शब्दांचा वापर करून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या झटापटीत महिलेच्या ब्लाउजची बाहीही फाटल्याचे सांगण्यात आले.

तडीपार करण्याची धमकी

महिलेने आरडाओरड करून मदत मागितल्या नंतरही आरोपीने तिला जिवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून तडीपार करण्याची धमकी दिल्याचा गंभीर लोणार पोलिसाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे उदनापूर परिसरासह लोणार तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मातंग समाज व अन्य सामाजिक संघटनांकडून आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे लोणार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम ७४, २९६, ११५(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ३(१) (आर), ३(१) (एस), ३(१) (यु), ३(१) (डब्ल्यू) (आय), ३(१) (डब्ल्यू) (आयआय), ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कायद्यातील अलीकडील सुधारणेनुसार या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.