बुलढाणा : खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे जगविख्यात असलेल्या लोणार नगरीचा पुराण काळातील पौराणिक ग्रंथात देखील उल्लेख आहे.अयोध्येचे युवराज श्रीरामचंद्र, त्यांच्या अर्धांगिनी सीतामाई आणि बंधू लक्ष्मण यांनी आपल्या वनवास काळात लोणार सरोवर परिसरात वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. अंतराळातून विशाल उल्का या भूमीत कोसळल्याने या सरोवरची निर्मिती झाली.
या सरोवर परिसरात सीता न्हाणी आहे. अनेक पुरातन मंदिर देखील या नगरीत आहेत. असा पौराणिक वारसा लाभलेल्या लोणार शहरात शुक्रवारी १६ मे रोजी किराणोत्सव रंगला! हा उत्सव मानवी वा ‘इव्हेंट’नसून तो नैसर्गिक उत्सव आहे.त्याला पुरातन भारतीय स्थापत्य शास्त्र,खगोल शास्त्र याचा मिलाफ देखील म्हणता येईल.येथील पुरातन दैत्यसूदन मंदिरात दरवर्षी मे महिन्यात केवळ आणि केवळ पाच दिवस हा सूर्य किरणांचा अद्भुत खेळ रंगतो . यावेळी श्री चरणी शहस्त्र सूर्य किरणे प्रकाश रुपी अभिषेक करतात . यामुळे किरणोत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरवरचे पर्यटक आणि भाविक सरोवर नगरीत डेरे दाखल होतात.
शुक्रवार, १६ मे पासून या किरणोत्सवाला प्रारंभ झाला. येत्या २० मे पर्यंत हा सूर किरणांचा आणि श्री चरणी तेजोमय अभिषेकाचा खेळ रंगणार आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते ११. ४५ वाजेदरम्यान असा तब्बल पाऊण तास श्रींच्या चरणी सूर्य अभिषेक होत असतानाचे मनोहरी दृश्य शेकडो भाविकानी पाहिले, मोबाईल च्या कॅमेऱ्यात साठवले!यावेळी लोणार सह दूरवरच्या शेकडो भाविक, पर्यटक आणि अभ्यासकांची गर्दी होती.पुरातत्व विभागाने उत्तम व्यवस्था केली होती.तसेच पिण्याच्या पाण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.