बुलढाणा: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात निर्णायक ठरणाऱ्या बारावीचा पेपर देण्यासाठी दुचाकीने जाणाऱ्या विध्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला.
चिखली तालुक्यातील मालगणी फाटा येथे गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी ही दुर्दैवी घटना घडली. शंतनू नारायण अंभोरे ( वय २१ वर्षे, राहणार एकलारा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा) असे मृत परीक्षार्थी चे नाव आहे.
बुलढाणा येथील परीक्षा केंद्रावर असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी तो दुचाकीने निघाला होता. परीक्षा देण्यासाठी दुचाकीवरून बुलढाण्याकडे जात असताना भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार युवक अक्षरशः चिरडला गेल्याने ही धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर मालगणी फाट्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत पोलिसांना माहिती दिली. मात्र ट्रकच्या धडकेत तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. घटनास्थळी ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला. नागरिक प्रक्षुब्ध झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मालगणी फाटा परिसरातील वाहतूक सुरळीत केली.
तसेच संतप्त नागरिकांची समजूत घालून त्यांना शांत केले. अज्ञात चालकविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले . यामुळे घटना स्थळी निर्माण झालेला तणाव निवळला. दरम्यान मालगणी फाटा परिसरात नियमित अंतराने होणाऱ्या अपघातांमुळे हा रस्ता ‘मृत्यूचा सापळा’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
