बुलढाणा : संकट कोसळले नशीब रुसले, नियती कोपली की एखादे हसते खेळते कुटुंब कसे उद्ध्वस्त होते याचा भीषण प्रत्यय अधूनमधून अनेकांना येतो. असाच भीषण आणि दुर्दैवी प्रत्यय विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील एका कुटुंबाला आणि पर्यायाने संपूर्ण गावकऱ्यांना आला.
एका आनंदी कुटुंबावर काळाने झडप घातली आणि मायलेकांचा मृत्यू झाला. या घटनेतून आईची लेकरावरची माया किती असते, पोटच्या गोळ्यावर तिचा किती जीव राहतो हे देखील सिद्ध झाले. केवळ अपघाताने लागलेल्या आगीत होरपळून मुलाचा करुण अंत झाला. लेकाच्या अकाली निधनाचा धक्का असह्य झाल्याने आईचाही मृत्यू ओढावला. अशी ही शोकांतिका हरणखेड गावात घडली.
ओम संदीप होले (७ ) आणि वनिता संदीप होले (३२) दोन्ही राहणार हरणखेड, तालुका मलकापूर, अशी दुर्दैवी आणि अकाली मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत.
बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओमचा होरपळून मृत्यू झाला आणि पोटच्या लेकराच्या मृत्यूची बातमी समजताच अगोदरच आजारपणाने खंगलेल्या आईनेही धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना हरणखेड येथे घडली. शेतकरी संदीप होले हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दुपारी ओम वडिलांना घरी बोलावण्यासाठी शेतात आला. त्या वेळी तुरीच्या पेंढ्या गोळा करून बैलगाडीवर रचण्यात आल्या होत्या. ओम त्या गंजीवर बसला होता. खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून आजूबाजूच्या शेतात कचरा जाळला जात असताना अचानक जोराचा वारा सुटला. पेटलेल्या कचऱ्यातील ठिणगी तुरीच्या पेंढ्यांवर पडताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.
संदीप होले यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. गंभीर भाजलेल्या ओमला तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथे नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे जळगाव खान्देश येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
ही बातमी समजताच अंथरुणाला खिळून असलेल्या आई वनिता होले यांना असह्य धक्का बसला आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. या मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने हरणखेडसह पंचक्रोशत शोककळा पसरली असून समाजमन सुन्न झाले आहे. या दुहेरी धक्क्यातून संदीप होले, नातलग, शेजारी पाजारी अजून बाहेर पडले नाहीये.

